रोमटामेळात आडपईचे सुयोग पथक प्रथम : साखळीतील शिमगोत्सव समितीतर्फे स्पर्धांचा निकाल जाहीर

पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्ष सिद्धी प्रभू. सोबत सिद्धेश काणेकर, सुदेश काणेकर, गोविंद कामत व इतर.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : साखळी शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथ, रोमटामेळ, लोककला नृत्य कला सादरीकरण, खुला गट वेशभूषा आदी स्पर्धांचा निकाल शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. चित्ररथ स्पर्धेत बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समिती, रोमटामेळ स्पर्धेत आडपईचे सुयोग पथक, तर लोककला नृत्य स्पर्धेत धनगर नृत्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
चित्ररथ स्पर्धेतील द्वितीय ते सहावे क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे त्रिवेणी कला संघ-फोडा, दाढ साखळा स्टार-माशेल, श्री देव धाडेश्वर स्पोर्ट्स-नेरूळ, देवतेवाडा युवक मंडळ-कुडचडे व हनुमान युवक संघ यांना प्राप्त झाले. रोमटामेळ स्पर्धेत दुसरे ते सहावे क्रमांकाचे बक्षीस मांडलेश्वर-शिरोडा, आंबेडकर समाज-बोरी, स्वरसाई-म्हापसा, टोणयेश्वर-साखळी व नवदुर्गा-मडकई यांना मिळाले. लोककला नृत्य सादरीकरण स्पर्धेत दुसरे बक्षीस कुणबी नृत्या, तिसरे समई नृत्याला, चौथे घोडेमोडणीला, पाचवे मोरूलो व सहावे गोफ नृत्याला प्राप्त झाले.
पत्रकार परिषदेला साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, सचिव सिद्धेश काणेकर, कार्यक्रम प्रमुख सुदेश काणेकर, खजिनदार गोविंद कामत, क्रांती नार्वेकर, युवराज नाटेकर, यतीन गोसावी, रमाकांत च्यारी, ओमकार साखळकर, दादा नाईक आदी उपस्थित होते.
मिरवणुकीवेळी स्टँड उभारून बसण्याची व्यवस्था
साखळी शिमगोत्सव समितीतर्फे यावर्षी मिरवणूक सरकारी महाविद्यालय जंक्शन ते हाऊसिंग बोर्ड जंक्शन या मार्गावर काढण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर वेशभूषा स्पर्धेतील विविध कलाकारांनी वातावरण निर्माण केले. त्यानंतर लोककला नृत्य पथकांना सोडण्यात आले. यामध्ये जास्त अंतर पडून लोकांचा विसर होऊ नये यासाठी चित्ररथ सोडण्यात आले. त्यामुळे उपस्थितांना चित्ररथांचा आनंद लुटता आला. चित्ररथांच्या मागोमाग रोमटामेळ पथकांनी सादरीकरण केले. लोकांना लागोपाठ सर्व सादरीकरणांचा आनंद लुटता आला. साखळी शिमगोत्सव समितीतर्फे गेल्यावर्षीप्रमाणेच खास स्टँड उभारून लोकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे लोकांना एका जागी बसून शिमगोत्सवाचा आनंद लुटता आला. मिरवणुकीत खंड न पडता अखंडितपणे चालूच राहावी यासाठी नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांच्यासह समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.
वेशभूषा स्पर्धेत धनंजय, आरोही अव्वल
वेशभूषा स्पर्धेतील मोठ्या गटात प्रथम सहा क्रमांकांची बक्षिसे अनुक्रमे धनंजय नाईक (अष्टकाली), उदय नाईक (पाडेली), पार्थ वायंगणकर (यमराज), सिद्धेश मराठे (नृसिंह), विशाल नाईक (पोतराजा), आदर्श नाईक (यमदेव) यांनी पटकावली. वेशभूषा स्पर्धा लहान गटात पहिले बक्षीस आरोही वेर्णेकर (सूर्यदेव), दुसरे मिष्टी सावंत (काली), तिसरे मयुरी कोरगावकर (अंबा), चौथे धृवी शेटगावकर (कार्तिकेय), पाचवे कियान नाईक (हनुमान), तर सहावे बक्षीस सुरेखा किनळेकर (गरुड अवतार) यांना प्राप्त झाली.