डिचोली, केपे, काणकोण तालुक्यात मुलांपेक्षा मुलींची जन्म नोंदणी अधिक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
59 mins ago
डिचोली, केपे, काणकोण तालुक्यात मुलांपेक्षा मुलींची जन्म नोंदणी अधिक

पणजी : गोव्यात (Goa) १ जानेवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ५२ हजार ६४४ बालकांच्या जन्माची नोंदणी झाली आहे. यामध्ये २६ हजार ९१९ मुले तर २५ हजार ७२५ मुलींचा समावेश आहे. बहुतेक तालुक्यांत मुलींच्या तुलनेत मुलांच्या जन्म नोंदणीचे प्रमाण अधिक आहे. असे असले तरी डिचोली (Bicholim), केपे (Quepem) आणि काणकोण (Canacona)  तालुक्यात मात्र मुलांपेक्षा मुलींच्या जन्माची नोंदणी अधिक आहे.

बार्देश तालुक्यात (Bardez Taluka) मुले आणि मुलींच्या जन्माच्या नोंदणीतील फरक सर्वाधिक आहे. तर पेडण्यात हा फरक सर्वात कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत डिचोली तालुक्यात ६०५ मुले तर ६०९ मुलींच्या जन्माची नोंदणी झाली आहे. केपे तालुक्यात ५२३ मुले आणि ५२९ मुली तर काणकोण तालुक्यात ४१ मुले व ४५ मुलींच्या जन्माची नोंदणी झाली आहे. पेडणे तालुक्यात ११५ मुले व १०९ मुली, सत्तरीमध्ये ९२ मुले व ८५ मुली, सांगेमध्ये ३७ मुले आणि ३० मुली, धारबांदोडा मध्ये ३२ मुले व २४ मुलींच्या तर फोंडा तालुक्यात २७६६ मुले आणि २६७० मुलींच्या जन्माची नोंदणी झालेली आहे. 

तीन वर्षांत बार्देश तालुक्यात ५९४६ मुले आणि ५५०९ मुलींच्या जन्माची नोंदणी झाली. दोन्ही लिंगांच्या नोंदणीतील फरक ४४० इतका होता. तिसवाडी तालुक्यात हा फरक ४२४, सासष्टी मध्ये १७१ तर मुरगाव तालुक्यात ५२ इतका होता. राज्यात वरील काळात ४७ हजार ५६८ जणांच्या मृत्यूंची नोंदणी झाली आहे. यामध्ये २७ हजार ६५६ पुरुष व १९ हजार ९१२ महिला होत्या. तिसवाडी तालुक्यात सर्वाधिक १८ हजार २४६ जणांच्या मृत्यूंची नोंदणी झाली. यात ११ हजार ५०९ पुरुष तर ६७३७ महिला होत्या.

हेही वाचा