विषमज्वराचे २ रुग्ण सापडले, संकुलात तात्पुरता आरोग्य तपासणी विभाग सुरू

दाबोळी : दाबोळीतील (Dabolim) प्रभू व्हायोलेटा निवासी संकुलात सांडपाणी पिण्याच्या पाण्यात (Water) मिसळल्याने उद्भवलेल्या परिस्थितीची दखल घेत जलस्त्रोत विभागाने (WRD) संकुलातील बोअरवेल सील केली. या परिसरातील अतिसाराच्या रुग्णांची संख्या १५६ वर पोहोचली असून, दोन विषमज्वराचे रुग्णही सापडले. संकुलात तपासणी करण्यासाठी कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य (Primary Health Center) केंद्रातर्फे तात्पुरता आरोग्य तपासणी विभाग सुरू करण्यात आला आहे.
या परिसरातील बागेत सांडपाण्याचा निचरा होत असल्याचे दिसून येताच येथील रहिवाशांनी तक्रार केली. त्यानंतर पोलीस तसेच प्रशासनातील इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याचे पाहून त्यांनी कारवाई सुरू केली. जलस्त्रोत खात्याने बोअरवेल सील केली.
दरम्यान, अतिसाराच्या रुग्णांची संख्या १५६ वर पोहोचली आहे तर आज शनिवारी दोन विषमज्वराचे (टायफॉईड) रुग्ण सापडल्याची माहिती कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी दिली. एकूण परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता कुठ्ठाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने (PHC) दाबोळीतील प्रभू व्हायोलेटा संकुलात तपासणी विभाग सुरू केला आहे व डॉक्टरांची टीमही पाठवण्यात आली आहे.
प्रभू व्हायोलेटा संकुलात तात्परता तपासणी विभाग सुरू केला असून, याठिकाणी डॉक्टरांची टीम तैनान करण्यात आली आहे. तपासणी विभाग सुरू करण्यासाठी सोसायटीने खोली उपलब्ध करून दिली असल्याचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी सांगितले.
दरम्यान, संकुलातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांकडून होत असून प्रशासनाकडूनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.