रॅली दिग्गज हरि सिंहसहीत तीन भारतीय बेपत्ता

मालदीव : मालदीवमध्ये (Maldives) घडलेल्या भीषण स्पीडबोट अपघातात भारतातील (Indian) प्रख्यात रॅली कार चालक हरि सिंह ( Hari Singh) हे बेपत्ता झाले असून; उद्योगपती गौतम सिंघानिया ( Gautam Singhania) जखमी झाले असले तरी ते सुरक्षित आहेत. या घटनेनंतर शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्पीडबोटमध्ये (Speed Boat) एकूण सात जण प्रवास करत होते. अपघाता वेळी बोट उलटल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर सिंघानिया आणि इतर काही प्रवाशांना वाचवण्यात यश आले. मात्र हरि सिंह यांच्यासह आणखी दोन भारतीय प्रवासी बेपत्ता आहेत.
या दुर्घटनेनंतर भारतीय नौदल (Indian Navy) आणि मालदीव प्रशासनाकडून संयुक्त शोधमोहीम राबवली जात आहे. अपघातग्रस्त परिसरात सध्या कसून शोधकार्य सुरू आहे.
हरि सिंह यांची भारतीय मोटरस्पोर्ट्समधील कामगिरी
हरि सिंह हे भारतीय मोटरस्पोर्ट्समधील एक मोठे नाव मानले जाते. त्यांनी इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप पाच वेळा जिंकली आहे. तसेच आशिया झोन रॅली चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी विजेतेपद पटकावले होते. त्यांनी भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले होते.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे क्रीडा आणि उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून हरि सिंह यांचा शोध लागावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.