
पणजी : विर्नोडा, पेडणे (Pernem) येथे ऐन काजू हंगामात काजू बागायतीला (Cashew Plantation) आग लागून मोठी हानी झाली. श्री रवळनाथ मंदिराच्या मागे माळरानावरील काजू बागायतीला आग लागली. माळरानावरील वाळलेले गवत व पालापाचोळ्यामुळे आग वेगाने सर्वत्र पसरली. त्यामुळे धूर व आगीच्या लोटांनी सर्व परिसर भरून गेला. त्यात काजूची झाडेही होरपळली.
आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या (Firebrigade) जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले. स्थानिकांनीही आग विझवण्यासाठी सहकार्य केले. आग नेमकी कशी लागली याचा शोध अग्निशमन दल घेत आहे.
दरम्यान, ऐन काजू हंगामात बागायतीला आग लागल्याने, बागायतदारांची हानी झाली व नुकसानीला सामोरे जावे लागल्याची माहिती काही स्थानिक बागायतदारांनी दिली. नेमकी किती हानी झाली त्याची माहिती सखोल पडताळणी केल्यावर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.