मंड म्हणजे पाणी. पाण्याच्या उदरातून जन्माला आली म्हणून माया-मंडोदरी या नावाने ओळखली जाऊ लागली. कालोत्सवाच्या दिवशी श्री मंडोदरी देवी आपल्या लाडक्या 'नारबंधो'ला भेटण्यासाठी श्री नारायण मंदिरात जाते. वाटेत भक्तगण देवीचे दर्शन घेतात. ओट्या भरतात. दारुकामाची आतषबाजी होते.

अंत्रुज महालातील बेतकी हा निसर्ग संपन्न गाव. गावात कशाचीही कमतरता नव्हती. पण त्यावर्षी पावसाची अतिवृष्टी झाली आणि पाणी अडवण्यासाठी तळ्याला घातलेला बांध फुटला. अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा बांध बुजेना. शेतकऱ्यांचा आधार असलेल्या तळ्यातील सारे पाणी वाहून जाऊ लागले. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे, तर उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे पिकाची नासाडी होऊ लागली. तांत्रिक उपाय यशस्वी होत नसल्याचे पाहून गावातील लोकांनी मांत्रिकाकडे धाव घेतली. बांध टिकून रहायचा असेल तर या ठिकाणी कुमार व कुमारिकेचा बळी द्यावा लागेल. हे ऐकून सारा गाव भयभीत झाला. कोणी महाभाग एखाद्याची फसवणूक करून हे कुकर्म करेल या भीतीने प्रत्येकजण आपआपल्या मुलांना डोळ्यात तेल घालून जपू लागला. कारण गावाचे रक्षण करणाऱ्यांच्या मनाने दुर्बलाचे भक्षण करण्याचे योजले होते. ते बळीच्या शोधात होते. तळ्याच्या काठावर एक विधवा ब्राह्मण स्त्री रहात होती. ऐन तारुण्यात पतीचे निधन झाल्याने संसाराचा गाडा तिला एकटीलाच ओढावा लागत होता. माया व नारायण या दोन मुलांकडे पाहून ती दिवस घालवत होती.
दुपारची वेळ होती. सगळीकडे सामसूम होते. नेहमीप्रमाणे दोन्ही भावंडे तळ्याकाठावर उभी होती. इतक्यात त्यांचे लक्ष पाण्यावर तरंगत असलेल्या पिवळ्या धमक केळ्यांच्या घडाकडे गेले. ती पिकलेली केळी पाहून नारबंधोच्या तोंडाला पाणी सुटले. तो पटकन पाण्यात उतरला. अगदीच हाताशी असलेल्या घडाला त्याने हात घातला. हात घालताच केळी झटक्यात दूर गेली. ते पहाताच नारायण आणखी पुढे गेला. पुन्हाही तसेच घडले. घडाला बांधलेली दोरी हातात घेऊन कोणीतरी तळ्याच्या काठावरच्या झुडपामध्ये लपून बसलेला असून, तोच हा केळीचा घड पुढेपुढे नेत असल्याचे मायाच्या लक्षात येताच ती जीवाच्या आकांताने ओरडली 'नारबंधो, पाणी खोल आहे पुढे जाऊ नकोस.' पण तिची हाक कानावर पाहोचण्यापूर्वीच सारा खेळ संपला होता. तिच्या बंधोने एव्हाना एक दोन गटांगळ्या ही खाल्ल्या होत्या. घडलेला सारा प्रकार तिच्या ध्यानात आला. गावकऱ्यांनी गावाच्या भल्यासाठी आपली व आपल्या पाठच्या भावाची निवड केलेली आहे. आमच्या जाण्याने गावाचे भले होत असेल तर आपले जीवन सार्थकी लागेल असा विचार मनात येताच, 'नारबंधो, थांब, एकटा जाऊ नकोस, मी ही येते तुझ्याबरोबर." असे म्हणत तिनेसुद्धा पाण्यात उडी घेतली. दोघांचाही बळी घेण्यासाठी टपून बसलेल्या गावकऱ्यांची युक्ती सफल झाली होती.
संध्याकाळी ब्राह्मणी घरी आली. आई दिसताच क्षणी कुशीत विसावणारी दोन्ही मुलं न दिसल्याने ती एकदम घाबरी घुबरी झाली. तिने त्यांना हाका मारल्या. वाड्यावर जाऊन चौकशी केली; पण कोणीच काही बोलत नव्हते. कोणीच कसे बोलत नाही, कुणालाच कशी दिसली नाही? अंधार पडू लागला तरीही मुलांचा काहीच ठावठिकाणा नसल्याचे पाहून आता मात्र नक्कीच कुठेतरी घातपात झाला असावा असा संशय तिच्या मनात घर करू लागला. तरीही मुलं येतील या आशेने सारी रात्र तिने जागून काढली. दुसरा दिवस उजाडला. दुपार झाली आणि दोन्ही मुलं पाण्यावर तरंगत असल्याची बातमी तिच्या कानावर येऊन थडकली. ग्रामस्थांनी मान खाली घालून सगळे विधी पार पाडले. जे घडले तो एक अपघात होता असे भासवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. सत्य कधी लपून रहाते का?
घातपातच केला असल्याची वार्ता कोणी तरी तिच्या कानावर घातली. रडून रडून आता तिच्या डोळ्यातील पाणी देखील सुकून गेले होते. अंतःकरणातील भावना नष्ट झाल्या होत्या. क्रोध अनावर होऊन' या गावात चोवीस वर्षे अन्न शिजणार नाही' असा शाप देऊन त्याच क्षणी ती गाव सोडून निघून गेली. मातेच्या दुःखी अंतःकरणातून निघालेल्या शापवाणीने साऱ्या गावाची दुर्दशा झाली. जमिनी ओसाड पडल्या.
विधवा ब्राह्मण स्त्री निघून गेल्यास आता जवळजवळ अठरा-वीस वर्षांचा कालावधी लोटला होता. बेतकी गावात आता फक्त घरांचे भग्नावशेष दृष्टीस पडत होते. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांच्या धर्मातराला घाबरून आपली देव-दैवते घेऊन हिंदू बांधव सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करू लागले. त्यावेळी एक शेतकरी कुटुंब बेतकी गावात पोहोचले. पाण्याच्या शोधार्थ निघाले असता सगळी जागा पाणथळ असूनदेखील पिण्यालायक पाणी कुठेच सापडेना. वाटसरुकडे चौकशी केली असता घडलेला सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. येथे स्थायिक झाल्यास शेती-बागायतीचे उत्पादन काढून गाव पुन्हा वसविता येईल यासाठी त्या विधवा स्त्रीला शोधून काढून तिची माफी मागणे व उःशाप मिळवणे आवश्यक होते. कुटुंब प्रमुखाने शेजारच्या गावातील त्या स्त्रीला ओळखणाऱ्या काही माणसांशी संवाद साधला व त्यांना बरोबर घेऊन शोध घ्यायचे ठरवले. प्रवासात चरितार्थासाठी लागणारे धनधान्य घेऊन ते ब्राह्मण स्त्रीच्या शोधार्थ बाहेर पडले. पुष्कळ ठिकाणी शोधाशोध करून देखील तिचा पत्ता लागेना. संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी एका म्हातारीच्या ओसरीवर रहाण्यासाठी परवानगी घेतली. आपल्या गाठोड्यात असलेले तांदूळ म्हातारीकडे दिले व जेवण करून वाढण्याची विनंती केली. म्हातारीने तांदूळ नेऊन शिजत घातले. थोड्या वेळाने ते शिजले का पहाण्यासाठी तिने झाकण उघडले असता, त्या शिजलेल्या तांदळाचा वास तिच्या नाकात गेला. ती एकदम चपापली 'या तांदळाना तर त्या 'पाड्या' गावच्या तांदळांचा वास येतो.' नकळत तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. तिच्या तोंडचे हे उद्गार बाहेर आराम करत असलेल्या प्रमुखाने स्पष्टपणे ऐकले. तो ताडकन उठला व चुलीजवळ गेला. पाठोपाठ इतर मंडळीही आत गेली व तिची ओळख पटते का हे पाहू लागली.
आई, आम्ही चुकलो ! आम्हाला क्षमा कर, असे म्हणत प्रमुखाने तिचे पाय धरले. तिला नमस्कार करून बेतकी गावची झालेली दुर्दशा व अन्न पाण्याविना लोकांचे झालेले हाल कथन केले. त्यांचे ते केविलवाणे चेहरे पाहून स्त्री हृदयाला पाझर फुटला. तिने चोवीस वर्षांचा कालावधी चोवीस तासांवर आणला, गावात चोवीस तास अन्न शिजणार नाही, जेवण घेता येणार नाही, असा उःशाप दिला. हे ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला. ब्राह्मण स्त्रीला त्यांनी बेतकी गावात येण्यासाठी आग्रह केला, पण तिने नकार दिला. 'बेतकी गावासाठी प्राण अर्पण करून माया-नारबंधोने देवत्व प्राप्त करून घेतलेले आहे. आम्ही त्यांची देवळे उभारणार आहोत, आम्हाला आशीर्वाद द्या.' असे म्हणून ते तिच्या पाया पडले. ब्राह्मण स्त्रीनेसुद्धा आपल्या मुलांबद्दल दाखवलेला त्यांचा भक्तीभाव पाहून उदार अंतःकरणाने बेतकी गाव व तेथील रहिवाशांचे परमेश्वर कल्याण करो असा आशीर्वाद दिला. तिच्याकडून उःशाप व आशीर्वाद घेऊन सर्वजण बेतकी गावात परतले. दिलेल्या वचनाप्रमाणे माया व नारायण यांची गावात मंदिरे उभारण्यात आली.
मंड म्हणजे पाणी. पाण्याच्या उदरातून जन्माला आली म्हणून माया-मंडोदरी या नावाने ओळखली जाऊ लागली.
आज बेतकी गावामध्ये 'नवीन वसणूक' या अर्थाने नव्याचा दिवस साजरा केला जातो. नवीन पिकलेल्या भाताची कापणी केल्यानंतर तो भात देवीला अर्पण करतात, नव्या वर्षाचे भाताचे पीक आल्यानंतर पहिल्यांदा भात कापणे याला 'नवे' असे म्हणतात. नव्याच्या रात्री बेतकी गावात चूल पेटत नाही, म्हणजेच भात शिजवत नाही. उःशापाप्रमाणे या गावातील लोक २४ तास अन्न शिजवत नाहीत. कोणालाही जेवण करायचे असल्यास गावच्या सीमेबाहेर जावे लागते.
कालोत्सवाच्या दिवशी श्री मंडोदरी देवी आपल्या लाडक्या 'नारबंधो'ला भेटण्यासाठी श्री नारायण मंदिरात जाते. वाटेत भक्तगण देवीचे दर्शन घेतात. ओट्या भरतात. दारुकामाची आतषबाजी होते. रात्री काला होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी गौळणकाला होतो. त्यानंतर सूर्यास्तापूर्वी मंडोदरीची पालखी पुनश्च मंदिराकडे येते. पारंपरिक वायंगणी पूजा, सर्दी पूजा, बियांतोणी, गडलोळा हे शेती विषयक उत्सव त्याचप्रमाणे शिगमोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, शिवरात्र हे उत्सव साजरे केले जातात. शिवरात्रोत्सवाच्यादिवशी देवी मंडोदरीची पालखी देवीच्या आदिस्थानाकडे म्हणजेच तळ्याकडे जाते. पालखीसोबत सुवासिनी बायका दिवजे पेटवून घेऊन जातात. या दिवशी गावचे मूळ निवासी (ज्यांना 'खेळे' असे संबोधले जाते) जत्रेसाठी तळ्यावर येतात. त्यांच्या सुवासिनी महिला तळ्यावर दिवज पेटवतात. पहाटे देवीच्या पालखीबरोबर दिवज घेऊन मंडोदरीच्या मंदिरात येतात. सर्व पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हा गाव सोडून आपल्या राहत्या ठिकाणी निघून जातात.