
वास्को : गोव्यातील (Goa) बेळे, वेळसाव (Velsao) येथे दोन दुचाकी (Two wheeler) आग लागून जळाल्या. ही आग कुणीतरी मुद्दामहून लावल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. आगीत (Fire) एक दुचाकी पूर्णपणे जळून गेली तर दुसरी अंशत: जळाली. दोन दुचाकींना एकाच बरोबर आग लागल्याने; कुणीतरी मुद्दामहून आग लावल्याचा संशय अधिक बळावत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करावा, अशी मागणी ही स्थानिकांनी केली.
परिसरातील काही रहिवाशांनी सांगितले की, येथील श्री कृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे रात्री १ वाजेपर्यंत परिसरात लोकांची वर्दळ होती. त्यानंतर साधारणतः मध्यरात्रीनंतर २ वाजल्यानंतर आग लागण्याची किंवा लावण्याची ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.