
पणजी : एकोशी येथे मुख्य जलवाहिनी (water pipeline) फुटल्याने तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पोंबुर्फा (Pomburpa), एकोशी (Ecoxim) व साल्वादोर द मुंद येथील जलपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. जलवाहिनी फुटलेला एकोशीतील रस्ता वाहतुकीसाठी (Vehicles) बंद करण्यात आला आहे. वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली आहे.
जलवाहिनी फुटलेला रस्ता अरुंद असल्याने, सकाळी १० ते दुपारी १.३० दरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वाहतूक सुरू ठेवल्यास दुरुस्तीच्या कामात विलंब होऊन पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाहन चालकांनी या कालावधीत संबंधित मार्ग टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, झालेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.