डोनाल्ड ट्रम्प, बेंजामीन नेतान्याहू यांच्यात मतभेद

तेहरान : मध्यपूर्वेत तणाव अधिकच वाढत असून, इराण-इस्रायल-अमेरिका (Iran-Israel-USA) यांच्यामधील युद्धाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. इराणने गुरुवारी गल्फमधील तेल व वायू प्रकल्पांवर हल्ले तीव्र केले. हे हल्ले इस्रायलने इराणच्या महत्त्वाच्या गॅस क्षेत्रावर केलेल्या कारवाईच्या प्रत्युत्तरात झाल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्यात या कारवाईवरून मतभेद स्पष्ट झाले आहेत. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील हा सर्वात मोठा मतभेद मानला जात आहे.
प्रमुख घडामोडी
शुक्रवारी तेलाच्या किमतींमध्ये २ टक्क्यांपेक्षा पेक्षा अधिक घसरण झाली. पंतप्रधान नेतान्याहू यांनी संघर्ष लवकर संपण्याची शक्यता व्यक्त केल्याने बाजाराला काहीसा दिलासा मिळाला.
ब्रेंट क्रूडची किंमत १११९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली होती. (युद्धापूर्वी सुमारे ७० डॉलर), नंतर ती १०८.६५ डॉलरवर स्थिरावली. अमेरिकन क्रूडही १०१ डॉलरवरून खाली येत ९४ डॉलरच्या आसपास घसरली.
एलएनजी निर्यात १७ टक्क्यांनी घटू शकते : कतार
कतारच्या ऊर्जा मंत्र्यांनी इशारा दिला की, देशातील ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे एलएनजी निर्यात क्षमता १७ टक्क्यांनी घटू शकते आणि ती दुरुस्त होण्यासाठी ३ ते ५ वर्षे लागू शकतात.
अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी तेलाच्या किमती कमी करण्यासाठी इराणी तेलावरील निर्बंध सैल करण्याचा विचार होऊ शकतो, तसेच धोरणात्मक साठ्यातील तेल बाजारात आणण्याची शक्यता व्यक्त केली.
साऊथ पार्स गॅस क्षेत्रावरील हल्ल्यांमुळे दर वाढले
साऊथ पार्स गॅस क्षेत्र (South Pars gas field) हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रांपैकी एक मानले जाते. या क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक तेल दर वाढले असून, इराणकडून गल्फमधील ऊर्जा पायाभूत सुविधांवर प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांची भीती वाढली आहे.
पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या माहितीनुसार, इराणमध्ये निर्माण होणाऱ्या सुमारे ८० टक्के वीज उत्पादनासाठी नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील कोणताही हल्ला केवळ इराणपुरता मर्यादित न राहता जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम करू शकतो.
एकूण चित्र
इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक तेल बाजार, शेअर बाजार आणि चलन व्यवहारांवर ताण निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते यावर जागतिक अर्थव्यवस्थेचे गणित अवलंबून राहणार आहे.
भारतातील शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात
भारतातील शेअर बाजारात सकारात्मक सुरूवात झाली. निफ्टी ५० निर्देशांक १.१टक्के वाढून २३,४५७ वर तर सेन्सेक्स १.१४ टक्के वाढून ७५,०८५ वर पोहोचला. मात्र, रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला.