दोन दिवसांत विषय सोडवण्याचे दामू नाईक यांचे आश्वासन : आंदोलक

पणजी : सावर्डेतील (Sanvordem) झुवारी नदीवर (Zuari River) मिराबाग (Mirabag) येथे प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दोन दिवसांत विषय सोडवण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी मिराबाग येथे झुवारी नदीवर बंधारा बांधल्यास पर्यावरणावर होणारे परिणाम व स्थानिकांना कशाप्रकारे फटका बसणार याची माहिती दिली.
दामू नाईक यांनी मागण्यांची दखल घेत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. हा विषय दोन दिवसांत सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे दामू नाईक यांनी सांगितल्याचे आंदोलक म्हणाले.
अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात स्थानिक एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. निदर्शने, मोर्चे, निषेध फेरी काढून त्यांनी या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात बंधाऱ्या विरोधातील फलक घेऊन काहीजण गॅलरीत पोहोचले होते.
याप्रकरणी चारजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. मडगावातील लोहिया मैदानावरही आंदोलन केले होते. विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांनी त्यांना वाहनात बसवून पोलीस स्थानकावर नेले असता; तेथेही ठिय्या आंदोलन केले होते. मिराबाग येथील बंधारा प्रकल्प रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.