दाबोळीतील प्रभू व्हायोलेटा इमारतीतील परिस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
39 mins ago
दाबोळीतील प्रभू व्हायोलेटा इमारतीतील परिस्थिती नियंत्रणात : जिल्हाधिकारी

मडगाव: दाबोळी (Dabolim)  येथील प्रभू व्हायोलेटा इमारतीत पिण्याच्या पाण्यात (Water)  सांडपाणी मिसळल्याने निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी (Collector of South Goa) एग्ना क्लिटस यांनी ‌दिली. 

जिल्हाधिकारी क्लिटस यांनी सांगितले की,  अतिसार आणि उलट्यांची १५६ प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य खात्याकडून सर्व घरात स्क्रिनिंग केले असून;  सध्या नवे रुग्ण आढळत नाहीत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.  दाबोळी येथील अतिसाराच्या प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना यांनी पत्रकार परिषद घेतली.  त्यांनी सांगितले की, अतिसाराचा पहिला रुग्ण १२ मार्च रोजी आढळून आला होता. 

त्यानंतर तत्काळ आरोग्य विभागाकडून आवश्यक काळजी घेत पाण्याचे नमुने व रहिवाशांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पहिल्या आठवड्याभरात ५५ रुग्णांची वाढ झाली व आता १५६ रुग्ण आढळून आलेले आहेत. प्रभू व्हायोलेटा इमारत परिसरात पाच ब्लॉक असून, एकूण ३२८ फ्लॅट्स आहेत आरोग्य विभागाकडून सर्व घरांमध्ये जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आलेली आहे.

पाच ब्लॉक पैकी ब्लॉक ए मध्ये अतिसाराचे रुग्ण आढळून आलेले नाहीत.  इतर सर्व भागात रुग्ण आढळून आले आहेत. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही १६ मार्च रोजी या इमारत परिसरातील पाहणी करण्यात आली. या पाहणी वेळी इमारतींना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प योग्यरीत्या सुरू नसल्याचे आढळून आले.

त्यामुळेच अशुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिश्र होऊन त्या पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराचा त्रास होऊ लागला.  आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत बुधवारी केवळ दोन नवे रुग्ण आढळून आले.  गुरुवारी एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. ज्या रुग्णांना त्रास होत होता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गंभीर असा एकही रुग्ण सध्या नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बिल्डर्सना नोटीस पाठविण्यात आलेली आहे. इमारत परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते.

त्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साठवणूक टाकी व जलतरण तलावातील पाण्याचे नमुने निगेटिव्ह आले. तर बोअरवेल व बागेतील पाणीपुरवठ्याचा स्त्रोत यांचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. कारण त्यात अशुद्ध पाणी मिश्र झाले होते.

सध्या बिल्डर कडून इमारतीतील रहिवाशांना सार्वजनिक बांधकाम खाते व इतर माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बोअरवेलचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली.

  


हेही वाचा