"ते कृत्य गलिच्छच"; राजीनाम्यानंतर चाकणकरांचा अशोक खरातवर संताप

म्हणाल्या-वैयक्तिक आयुष्याची माहिती नव्हती; पोलिसांकडे सखोल तपासाची मागणी केल्याचे स्पष्टीकरण. महायुती सरकारमधील अंतर्गत घडामोडींना वेग.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
49 mins ago
"ते कृत्य गलिच्छच"; राजीनाम्यानंतर चाकणकरांचा अशोक खरातवर संताप

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांच्या आरोपांमुळे चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन काल सायंकाळी उशिरा आपला राजीनामा सुपूर्द केला. या निर्णयानंतर पत्रकारांशी बोलताना चाकणकर यांनी आपला संताप व्यक्त करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.


Image


अशोक खरात याच्या कृत्याबद्दल बोलताना चाकणकर म्हणाल्या की, खरात याने केलेले कृत्य अत्यंत गलिच्छ आणि निंदनीय आहे. आम्ही शिवलिका संस्थानशी अध्यात्मिक भावनेतून जोडले गेलो होतो. आमचे कुटुंब वारकरी परंपरेचे असल्याने सामाजिक आयुष्यात वावरताना आम्ही खरात यांना गुरु मानले होते. मात्र, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य किंवा त्याचे भविष्यातील कृत्य काय असेल, याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. जेव्हा ही घटना समोर आली, तेव्हा मला स्वतःला मोठा धक्का बसला, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, यासाठी आपण स्वतः पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.



यावेळी चाकणकर यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना काही वृत्तपत्रांनी आणि नेत्यांनी पसरवलेल्या माहितीवर तीव्र आक्षेप घेतला. गेल्या दोन दिवसांपासून माझ्याविरोधात जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या आणि खोटे फोटो पसरवले जात आहेत. मला 'सॉफ्ट टार्गेट' केले जात असून, माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न होत आहे. विशेषतः काही फोटोंमध्ये तारखांची छेडछाड करून मला या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ज्या फोटोंचा आधार घेतला जात आहे, त्या दिवशी माझ्या हाताला कोणतीही जखम नव्हती, हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकते, असे सांगत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.

रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेत सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांच्यासह चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे. महिला आयोगाकडे या प्रकरणाशी संबंधित जी काही पत्रे किंवा तक्रारी आल्या होत्या, त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आम्ही पोलिसांना दिले होते. आयोगाकडून कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले गेलेले नाही. खरात याचे नाव समोर येण्यापूर्वीच आम्ही संबंधित तरुणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे निष्पक्ष व्हावी आणि माझ्या पदाचा कोणताही अडथळा तपासात येऊ नये, यासाठी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, ही माझी सुरुवातीपासूनची मागणी आहे. आगामी काळात सविस्तर पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन आपण सर्व बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा