बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढली; यंदा ९२.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९३.९० टक्के; वाणिज्य आणि कला शाखेतही विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढली; यंदा ९२.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी
पणजी : गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेत २.३२ टक्क्यांनी अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी बारावीचा निकाल ९०.६४ टक्के लागला होता, जो यंदा वाढून ९२.९६ टक्के झाला आहे. यावर्षी परीक्षेला एकूण १७,२८३ विद्यार्थी बसले होते, त्यांपैकी १६,०६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.९३ टक्के, तर मुलांचा निकाल ९१.८९ टक्के लागला आहे. गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी शनिवारी पर्वरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सचिव विद्यादत्त नाईक आणि सहसचिव भारत चोपडे उपस्थित होते.

निकाल http://results.gbshsegoa.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

यावर्षी १० फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली. परीक्षेला एकूण १७,२८३ विद्यार्थी बसले होते, ज्यामध्ये ९,०८० मुली आणि ८,२०३ मुलांचा समावेश होता. एकूण मुलांपैकी ७,५३८ तर मुलींपैकी ८,५२९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. अभ्यासक्रमानुसार पाहिल्यास इतर शाखांच्या तुलनेत विज्ञान शाखेचे विद्यार्थी अधिक यशस्वी ठरले. या शाखेतील ५,४२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यांपैकी ५,०९७ (९३.९० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतील ४,११० विद्यार्थ्यांपैकी ३,७९० (९२.२१ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात मोबाईल नेला होता. यातील एका विद्यार्थ्याने प्रश्न पत्रिकेचा फोटो काढून तो चॅट जीपीटी वर अपलोड केला. मात्र त्याची उत्तरे मिळण्याआधीच दोन्ही फोन जप्त करण्यात आले. दोन्ही विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्याचा निर्णय घेतला आहे : भगीरथ शेट्ये , अध्यक्ष, शालान्त परीक्षा मंडळ

वाणिज्य शाखेतील ५,३१३ विद्यार्थ्यांपैकी ४,९३६ (९२.९० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याशिवाय व्होकेशनल कोर्ससाठी २,४३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यांपैकी २,२४४ म्हणजेच ९२.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षेत १३९ खाजगी उमेदवारांना संधी देण्यात आली होती, त्यातील ५९ जण (४२.४५ टक्के) उत्तीर्ण झाले. पुनर्रचित (रिपीटर) विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४८.८० टक्के राहिले, तर ८८८ पैकी ८५० दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९५.७२ इतकी आहे.


हेही वाचा