इराणच्या नातांझ अणुऊपक्रमावर पुन्हा हल्ला;किरणोत्सर्ग गळती नाही : इराण

जागतिक पर्यटनस्थळे, सार्वजनिक ठिकाणांवर हल्ला करणार : इराण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
33 mins ago
इराणच्या नातांझ अणुऊपक्रमावर पुन्हा हल्ला;किरणोत्सर्ग गळती नाही : इराण

तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध चौथ्या आठवड्यात प्रवेश करत असताना इराणच्या नातांझ अणुऊपक्रमावर  (Iran's Natanz nuclear enrichment facility)  वर पुन्हा हवाई हल्ला (airstrike) झाल्याची माहिती इराणने दिली आहे. मात्र या हल्ल्यानंतर कोणतीही किरणोत्सर्ग गळती (रेडिएशन लीक) झालेली नसल्याचा दावा अधिकृत वृत्तसंस्थेने केला आहे. 

इराणमधील हा प्रमुख अणु समृद्धीकरण प्रकल्प तेहरान पासून सुमारे २२० किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वीही जून २०२५ मधील इराण-इस्रायल संघर्षादरम्यान तसेच अमेरिकेकडून या ठिकाणावर हल्ले करण्यात आले होते. उपग्रह चित्रांनुसार काही इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसून आले होते. संयुक्त राष्ट्रांच्या अणुनियंत्रण संस्थेने त्या वेळी “किरणोत्सर्गाचा धोका नाही” असे स्पष्ट केले होते.

अमेरिकेची संदिग्ध भूमिका

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील लष्करी कारवाया कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले असले, तरी अमेरिकेने एकाचवेळी अतिरिक्त युद्धनौका आणि सुमारे २,५०० मरीन सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेची भूमिका संदिग्ध असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जागतिक पर्यटनस्थळे, सार्वजनिक ठिकाणांवर हल्ला करणार : इराण

इराणनेही आक्रमक भूमिका घेत जागतिक स्तरावर पर्यटनस्थळे व सार्वजनिक ठिकाणांवर हल्ल्याची धमकी दिली आहे. इराणचे लष्करी प्रवक्ते जनरल अबोलफजल शेकारची यांनी “शत्रूंसाठी जगभरातील उद्याने, पर्यटनस्थळे सुरक्षित राहणार नाहीत” असा इशारा दिला आहे.

जागतिक तेलदरात मोठी वाढ

याच पार्श्वभूमीवर जागतिक तेलदरात मोठी वाढ झाली असून; त्याचा परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारावरही झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने जहाजांवर आधीच लोड केलेल्या इराणी तेलावरील निर्बंध तात्पुरते शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंधन, अन्नधान्याच्या किमतीत वाढ

दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे अणु, लष्करी व ऊर्जा प्रकल्पांचे नेमके किती नुकसान झाले आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन व अन्नधान्याच्या किमती वाढत असल्याने आर्थिक परिणाम अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.



हेही वाचा