शिरगाव जत्रेच्या तयारीचा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीसह सर्व विभागांची समन्वय बैठक.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
49 mins ago
शिरगाव जत्रेच्या तयारीचा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

 डिचोली: गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या जत्रेच्या नियोजनासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव (IAS) यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांच्यासह पोलीस आणि विविध सरकारी खात्यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. जत्रेला येणाऱ्या भाविक आणि धोंडगणांच्या गर्दीचे तसेच इतर साधनसोयींच्या चोख व्यवस्थापनासाठी प्रशासनाने कडेकोट नियोजन आखले आहे.



या महत्त्वपूर्ण बैठकीत गर्दी नियंत्रण धोरण, पोलीस तैनात करणे आणि तात्पुरत्या नियंत्रण कक्षाची स्थापना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जत्रेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांचे नियोजन, बॅरिकेडिंग आणि भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी विशेष पथदिव्यांची व्यवस्था करण्यावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, पंचायत आणि अबकारी विभागासह अग्निशमन दलाच्या प्रतिनिधींना आपापल्या निर्धारित जबाबदाऱ्या तातडीने पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी सर्व संबंधित विभागांना १० एप्रिलपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, जत्रेच्या प्रत्यक्ष आयोजनापूर्वी सर्व व्यवस्थांची पडताळणी करण्यासाठी एक 'मॉक ड्रिल' (सराव मोहीम) घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा कशा प्रकारे कार्य करेल, याची स्पष्टता येईल. पोलीस अधीक्षक (उत्तर गोवा) हरिश्चंद्र मडकईकर आणि पोलीस अधीक्षक (वाहतूक) प्रबोध शिरवईकर यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाचा आराखडा सादर केला. 

हेही वाचा