१० एप्रिलपर्यंत होणार कामे पूर्ण : आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

शिरगाव जत्रेच्या तयारीची पाहणी करताना आमदार प्रेमेंद्र शेट. सोबत जिल्हाधिकारी अंकित यादव, हरीष मडकईकर, श्रीदेवी, दीनानाथ गावकर, विजय राणे व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : २१ एप्रिल रोजी होणाऱ्या शिरगाव येथील श्री लईराई जत्रेच्या पार्श्वभूमीवर १० एप्रिलपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाविक आणि धोंडांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
शिरगाव येथील श्री लईराई देवस्थानच्या सभागृहात शनिवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर, पोलीस अधीक्षक हरिष मडकईकर, उपअधीक्षक श्रीदेवी, मामलेदार शैलेंद्र देसाई, पोलीस निरीक्षक विजय राणे, वाहतूक, वीज, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे अधिकारी व मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत जत्रेत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्यात आला. देवस्थान समितीने काही नवीन सूचना प्रशासनाला केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामांचे निरीक्षण करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनी अधिकाऱ्यांसह जत्रेच्या परिसराची पाहणी केली. मंदिर परिसर, होमकुंड व तळीपर्यंतच्या भागाचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. काही आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
बैठकीनंतर पहिल्या टप्प्यातील कामांचा आढावा घेऊन सर्व विभागांना आवश्यक सूचना केल्या आहेत. जत्रेदिवशी भाविक आणि धोंडगणांना त्रास होऊ नये यासाठी सर्व कामे १० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, ती वेळेत पूर्ण होतील.
_ प्रेमेंद्र शेट, आमदार, मये
देवस्थान परिसरात ४१ सीसीटीव्ही कॅमेरे
देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, जत्रेच्या संपूर्ण परिसरात ४१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल आणि उर्वरित सर्व कामे १० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्यासाठी समिती विशेष प्रयत्न करणार आहे. शिरगाव जत्रा सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासन आणि देवस्थान समितीने जोरदार तयारी सुरू केली आहे.