मडगावात मानकुरादचा भाव किंचित उतरला

१५० ते ३०० रुपयांना १ नग दराने विक्री


40 mins ago
मडगावात मानकुरादचा भाव किंचित उतरला

मडगाव बाजारपेठेत मानकुराद आंब्याची विक्री करताना व्यापारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : होलसेल बाजारपेठेत मानकुराद आंबा १५० ते ३०० रुपयांना एक असा विक्री होत आहे. हापूस सुमारे १२०० रुपये डझन दराने विकला जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, एप्रिलच्या मध्यापर्यंत आंब्याची आवक वाढल्यानंतर दर कमी होतील. दक्षिण गोव्यातील प्रमुख व्यापार केंद्र असलेल्या मडगाव मार्केटमध्ये सध्या मानकुरादसह हापूस, तोतापुरी, सिंदुरी आणि पायरी आंब्यांनी हजेरी लावली आहे.
सुरुवातीला मानकुरादचा दर ५०० ते ६०० रुपयांना एक असा होता. आता छोट्या फळाला १५० व मोठ्या फळाला २५० ते ३०० रुपये दर आहे. उत्कृष्ट चव आणि सुगंधासाठी प्रसिद्ध असलेल्या या आंब्याची मागणी मोठी असते. २५०० रुपयांनी डझन घेतलेले आंबे २८०० रुपये डझन या दराने किरकोळ विक्री केली जात आहे. चांगल्या दर्जाचा हापूस १२०० रुपये डझन दराने उपलब्ध आहे. त्याखालोखाल रस काढण्यासाठी प्रसिद्ध पायरी आंबा २० रुपये प्रति नग दराने विकला जात आहे.
मानकुरादच्या सुरुवातीला किमती जास्त होत्या. आवक वाढल्याने सध्या दर उतरला आहे. एप्रिल व मे महिन्यात आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, दरही ग्राहकांना परवडणारे राहतील. मोठ्या प्रमाणावर मोहोर आला होता; पण वातावरणातील बदलामुळे तो गळून गेला. त्यामुळे ४० ते ५० टक्केच आंबा उपलब्ध होणार आहे.
_ राजेश नाईक, होलसेल आंबा विक्रेते       

हेही वाचा