साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

राज्यात गॅस सिलिंडरचे संकट, तर कारापुरात मेगा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ एकवटले

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : फोंडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्ध्यावर गुंडाळावे लागले. कारापूर गावात प्रस्तावित खासगी मेगा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेत हा प्रकल्प गावात होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची कमतरता निर्माण झाली. यातूनच गॅस वितरण करणाऱ्या वाहनावर कुंकळ्ळीत हल्ला करण्यात आला. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार 


हरमलात पट्टेरी वाघाचे दर्शन

हरमल देऊळवाडा येथील श्री रवळनाथ मंदिर ते मिठागर रस्त्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची घटना समोर आली. अचानक वाघ समोर आल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शी नागरिकाची क्षणभर बोबडी वळली. सुदैवाने वाघ काही क्षण रस्त्यावर थांबल्यानंतर जंगलाच्या दिशेने निघून गेल्याने मोठा अनर्थ टळला.

आसगाव स्वयंअपघातात डीजे करणकुमारचा मृत्यू

मुनांगवाडा-आसगाव येथे गतिरोधकावर मोटारसायकल उसळून झालेल्या स्वयंअपघातात करणकुमार कनुगा (४१, रा. शिवोली व मूळ सांताक्रूझ-मुंबई) याचा मृत्यू झाला. तो व्यवसायाने डीजे म्युझिशियन होता. हा अपघात रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडला.

कारापूरमध्ये मेगा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ एकवटले

कारापूर गावात प्रस्तावित खासगी मेगा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेत हा प्रकल्प गावात होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. यासाठी गावातील मैदानावर कारापूर ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सोमवार 

आचारसंहितेमुळे अधिवेशन अर्ध्यावर गुंडाळले

फोंडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सोमवारी विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आले. यावेळी विरोधकांनी केलेली लेखानुदान सादर करण्याची मागणी अमान्य करण्यात आली असून, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पासह अन्य सर्व खात्यांच्या मागण्या आणि विनियोग विधेयक मंजूर करण्यात आले.


सांगोल्डा येथे ३८ व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त

सांगोल्डा येथे एका निर्जनस्थळी बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले ३८ व्यावसायिक गॅस सिलिंडर नागरिपुरवठा खात्याच्या बार्देश विभागाने जप्त केले. यामध्ये १८ भरलेले (सील) आणि २० रिकामी (अन्सिल) सिलिंडरचा समावेश आहे.

मडगावात दुकान फोडल्याप्रकरणी तिघांना अटक

पाजीफोंड मडगाव येथे महिनाभरापूर्वी तीन दुकानांचे शटर तोडून अज्ञातांनी चोरी केलेली होती. याप्रकरणात मडगाव पोलिसांनी संशयित राशीद मुशीहादे, वाहीद बशीर व इर्शाद हस्मत या तिघांना अटक केली असून संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मंगळवार 

गॅस वितरण करणाऱ्या वाहनावर कुंकळ्ळीत हल्ला

कुंकळ्ळी येथील केगदीकट्टा परिसरात मेसर्स मल्टी ट्रेडर्स या एचपी गॅस एजन्सीच्या वितरण वाहनावर हल्ला करण्यात आला. यात वाहनाचा चालक आणि मदतनीस यांना मारहाण करण्यात आली. एजन्सी मालकाने कारवाईची मागणी केली आहे.

म्हापशात भंगारअड्ड्याला आग लागून ५ लाखांचे नुकसान

बोडगिणी-म्हापसा येथील कार्व्हालो पेट्रोलपंप जवळील राजेंद्र पांडे यांच्या भंगारअड्ड्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या दुर्घटनेत अड्ड्यातील ५० टक्के साहित्य जळाल्याने ५ लाखांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत लगेच पाण्याचा फवारा मारत आग नियंत्रणात आणली.

बुधवार

विद्यार्थ्याला म्हार्दोळात मारहाण

म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत दहावीचा पेपर संपल्यानंतर घरी जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे ४ अल्पवयीन विद्यार्थी तिसवाडी तालुक्यातील आहेत. या प्रकरणी म्हार्दोळ पोलीस स्थानकात ४ अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.


पूजा नाईकचा नार्को चाचणीला नकार

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने नार्को चाचणी करण्यास नकार दिला आहे. संशयिताने संमती नाकारल्यामुळे फोंडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्हे शाखेचा नार्को चाचणीचा अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आता पूजा नाईकची नार्को चाचणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आसगावमध्ये २३.८१ लाखांचा ड्रग्ज जप्त

सोनारखेड आसगाव येथे हणजूण पोलिसांनी छापा टाकून २३ लाख ८१ हजार रुपयांचा चरस आणि एक्टसी हा ड्रग्ज जप्त केला. या प्रकरणी संशयित आरोपी सोक्राटीस वासिलिओस मिचैलिडीस (५९, रा. बादे आसगाव) या ग्रीक नागरिकाला पोलिसांनी अटक केली.

केरी चेकपोस्टवर ३०० किलो बेकायदेशीर गोमांस जप्त

केरी चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामधून सुमारे ३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मांसाची अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवार

मडगावात बँकेत आढळल्या ५०० च्या बनावट नोटा

मडगाव शहरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. येथील आयडीबीआय बँकेत ५०० रुपयांच्या ९८ बनावट नोटा जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

हळदोणा येथे ट्रकची विजेच्या खांबाला धडक

पानारी हळदोणा येथे ट्रकाने रस्त्याकडेला असलेल्या वीज खांबाला धडक दिली. या अपघातात केबिनमध्ये अडकलेला वाहन चालक जगदीश माथेर (रा. बिजापूर कर्नाटक) याला पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

कुमठोळ-सत्तरी येथे आगीत काजू, माड बागांचे नुकसान

सत्तरी तालुक्यातील कुमठोळ परिसरात अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीत काजू व माड बागांचे मोठे नुकसान झाले. आगीत स्थानिक शेतकरी विश्वनाथ गावडे यांच्या बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शुक्रवार

पर्वरी एचडीएफसी बँकेत बनावट नोटा जमा

आल्तो, पर्वरी येथील एचडीएफसी बँक शाखेमध्ये पाचशे रुपयांच्या सात बनावट नोटा जमा करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी बँक खातेधारक मैबूबा डी. यालगी (रा. बिजापूर, कर्नाटक) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाळ्ळी येथे नदीत पोहण्यासाठी उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणाला पाण्यात उडी घेताना गंभीर जखम झाली. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना बाळ्ळी, केपे येथे घडली. नितीन गावकर (रा. बाळ्ळी, केपे) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

१० लाखांच्या गांजासह करमळीत दोन बिहारी युवकांना अटक

केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने करमळी रेल्वे स्थानकाजवळ ड्रग्ज तस्करी प्रकरणी कारवाई करून प्रिन्स कुमार (२०) आणि राजू रंजन कुमार (१९) या दोघा बिहारी युवकांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीचा १० किलो गांजा जप्त केला.

शनिवार

बारावीचा निकाल ९२.९६ टक्के

गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेत २.३३ टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा बारावीचा निकाल ९२.९६ टक्के लागला. यंदा परीक्षेला एकूण १७ हजार २८३ विद्यार्थी बसले होते. यातील १६ हजार ६७ उत्तीर्ण झाले. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

धारगळ येथे मालवाहू गाड्यांचा अपघात

धारगळ महाखाजन येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन मालवाहू गाड्यांचा अपघात झाला. मागून धडक बसल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. यात चालक सुखरुप राहिला.

विर्नोडा येथे काजू बागायतीला आग

विर्नोडा येथे ऐन काजू हंगामात काजू बागायतीला आग लागून मोठी हानी झाली. श्री रवळनाथ मंदिराच्या मागे माळरानावरील काजू बागायतीला आग लागली. माळरानावरील वाळलेले गवत व पालापाचोळ्यामुळे आग वेगाने सर्वत्र पसरली. त्यामुळे धूर व आगीच्या लोटांनी सर्व परिसर भरून गेला. त्यात काजूची झाडेही होरपळली.

लक्षवेधी

माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या फोंडा मतदारसंघासाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

नाईकनगर-बोर्डे, डिचोली येथे एका घरात वडील आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. एकाच खोलीत हे दोन्ही मृतदेह आढळून आले आहेत.

विधानसभेच्या फोंडा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा आठवड्याचा अवधी शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

फोंडा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे रितेश नाईक व आपतर्फे गीतेश नाईक यांच्या नावाची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे यापूर्वीच केतन भाटीकर यांच्या नावाची घोषणा केली होती. 

हेही वाचा