बेळगाव-पणजी महामार्गावरील ‘मोफत प्रवास’ संपला

गणेबैल टोल नाका पुन्हा सुरू : ‘एनएचएआय’कडून स्वयंचलित यंत्रणेद्वारे वसुली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st March, 11:17 pm
बेळगाव-पणजी महामार्गावरील ‘मोफत प्रवास’ संपला

बेळगाव : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग ७४८) वरील गणेबैल टोल नाक्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाहनचालकांचा मोफत प्रवास अखेर शनिवारी सायंकाळी संपला आहे. सुमारे आठवडाभर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प असलेली टोल वसुली आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) स्वयंचलित यंत्रणा आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुन्हा सुरू केली आहे.
किमान वेतनानुसार पगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ १४ मार्चपासून टोल नाक्यावरील सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी टोलचे बॅरिअर्स उघडून ठेवले होते, ज्यामुळे गोवा आणि कर्नाटकातील हजारो वाहनचालकांना एकही रुपया न देता सुसाट प्रवास करता येत होता. या टोल-फ्री प्रवासाचा वाहनचालकांनी मोठा आनंद लुटला, मात्र यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत होते.
प्रशासनाचा हस्तक्षेप आणि नवी व्यवस्था
महसुली तूट वाढू लागल्याने एनएचएआयने तातडीने पावले उचलली. एनएचएआयचे अधिकारी भुवनेश कुमार यांनी शनिवारी टोल नाक्यावर उपस्थित राहून ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली. त्यांनी सांगितले की, सध्या टोल वसुली पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. ज्या वाहनांवर ‘फास्टॅग’ नाही किंवा जे ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये आहेत, अशा वाहनांसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज भासत आहे. सध्या जवळच्या एजन्सीकडून घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम सुरू असून, लवकरच नवीन निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
जुन्या कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत केलेल्या निष्काळजीपणामुळे आणि संपामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे त्यांचे कंत्राट का रद्द करू नये, अशी नोटीस प्रशासनाने बजावली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती.
परिस्थिती पूर्वपदावर
संपावर असलेल्या स्थानिक कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दिलासा दिला आहे. नवीन कंत्राटदार नियुक्त करताना जुन्या स्थानिक कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन अधिकारी भुवनेश कुमार यांनी दिले आहे. सध्या गणेबैल नाक्यावर परिस्थिती पूर्वपदावर आली असून, हायटेक देखरेखीखाली टोल वसुली पुन्हा सुरू झाली आहे.

हेही वाचा