करमळी, नाकेरी केपेतील अपघातांत प्रत्येकी एकाचा मृत्यू

नाकेरीत स्वयंअपघात : करमळीत बुलेटच्या धडकेत पादचारी ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st March, 11:34 pm
करमळी, नाकेरी केपेतील अपघातांत प्रत्येकी एकाचा मृत्यू

पणजी : करमळी रेल्वे स्थानकाजवळ बुलेट मोटारसायकलने धडक दिल्यामुळे बादशाह शेख (५८, बायगिणी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी बुलेट मोटारसायकल चालक संकेत गावडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. तर, नाकेरी केपे येथील बसस्थानकाजवळ झालेल्या दुचाकीच्या स्वयंअपघातात रोहित सावंत देसाई (रा. नाकेरी) या ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी हवालदार विनोद फोंडवेकर यांनी अपघाताचा पंचनामा करून तक्रार दाखल केली. त्यानुसार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता करमळी रेल्वे स्थानकाजवळ बुलेट मोटारसायकलने एका पादचाऱ्याला धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक गौरीश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद फोंडवेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला.

बुलेट मोटारसायकल चालक संकेत गावडे डोंगरी ते जुने गोवाच्या दिशेने येत होता. याच दरम्यान करमळी रेल्वे स्थानकाजवळ पोहचताच बुलेट मोटारसायकल चालक गावडे याने पादचारी बादशाह शेख याला धडक दिली. त्यात शेख गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. मात्र, तिथे पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.

या प्रकरणी उपनिरीक्षक जस्वीता नाईक यांनी बुलेट मोटारसायकल चालक संकेत गावडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

दुचाकीच्या स्वयंअपघातात तरुणाचा मृत्यू

मडगाव : नाकेरी केपे येथील बसस्थानकाजवळ झालेल्या दुचाकीच्या स्वयंअपघातात रोहित सावंत देसाई (रा. नाकेरी) या ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला.

शनिवार, २१ मार्च रोजी पहाटे १२.२० वाजण्याच्या सुमारास बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कुंकळ्ळी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. रोहित आपल्या यामाहा मोटारसायकलवरून जात असताना नाकेरी, केपे येथील बसस्थानकाजवळ त्याचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. हा स्वयंअपघात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

​अपघातानंतर रोहितला तातडीने बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शवचिकित्सेसाठी मृतदेह मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवण्यात आला आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक सुदान भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा