वागातोर येथील अपघात : चालकावर निष्काळजीपणाचा ठपका कायम

पणजी : फोर्ड इन्डेवोर या आलिशान वाहनाने चिरडल्याने वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टच्या मालकिण रेमेडिया मेरी आल्बुकर्क ठार झाली होती. संशयित वाहन चालकाच्या रक्तातील दारू चाचणी आणि जैवरासायनिक विश्लेषण अहवाल नकारात्मक आला आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने वाहन चालक सचिन कुरूप याला सदोष मनुष्यवध प्रकरणाच्या आरोपातून सुटका केली. तर, निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने आल्बुकर्क यांचा मृत्यू झाल्यामुळे आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.
याबाबतचा आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. बाॅस्को राॅबर्ट्स यांनी दिला.
वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टच्या रिसेप्शनवर ११ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास आलिशान वाहनाने धडक दिली. त्यात जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टच्या मालकिण रेमेडिया मेरी आल्बुकर्क ठार झाली. तर शिव मंगल दिंडो व रुपा परास हे ला मेजर रोमा रिसॉर्टचे कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी वाहन चालक सचिन कुरूप याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणी तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात संशयित कुरुप याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले.
न्यायालयात वाहन चालक सचिन कुरुप याच्यातर्फे अॅड. कमलाकांत पोवळेकर यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी संशयित दारू पिऊन वाहन चालवत नव्हता. तसेच त्याच्या रक्तातील दारू चाचणी आणि जैवरासायनिक विश्लेषण अहवाल नकारात्मक आले आहे. त्यामुळे त्याला सदोष मनुष्यवध प्रकरणातून सुटका करण्याची मागणी केली.
दरम्यान, सरकारी अभियोक्ता शिवराम पाटील यांनीही बाजू मांडली. साक्षीदारांची साक्ष, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल, इतर पुरावे न्यायालयासमोर ठेवले. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला.
वाहन परवाना नाही, विमाही संपलेला
सरकारी अभियोक्ता शिवराम पाटील यांनी संशयिताकडे वैध वाहन परवाना नव्हता तसेच वाहनाचा विमा समाप्त झाला होता. तसेच वाहन अतिवेगाने चालवले गेले होते. या संदर्भात साक्षीदारांची साक्ष, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल, इतर पुरावे न्यायालयासमोर ठेवले.