...तर फोंडा पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल

फोंड्यात मगोच्या भूमिकेकडे भाजपचे लक्ष


48 mins ago
...तर फोंडा पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेले मंत्रिपद भरण्याबरोबरच, मगोला सरकारमध्ये ठेवण्याबाबत भाजप नेते फोंडा पोटनिवडणुकीच्या निकालानंतरच निर्णय घेणार आहेत. पोटनिवडणुकीत मगोचे नेते कोणती भूमिका घेतात, त्यांची भूमिका भाजपला मारक ठरते का याकडे भाजपचे लक्ष आहे. मगोचे अनेक कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत आहेत. निकाल भाजपला अपेक्षित असा लागला नाही तर पोटनिवडणुकीतील मगोच्या भूमिकेचे विश्लेषण होणार आहे.
फोंडा पोटनिवडणुकीत मगोची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मगो आमचा युतीचा घटक आहे. पोटनिवडणुकीत मंत्री सुदिन ढवळीकर व मगोचे काही कार्यकर्ते विरोधी उमेदवाराला मदत करत असल्याच्या तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. याची गंभीर दखल घेतली असून पक्ष मगो नेत्यांना सावधही करणार आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. फोंड्याच्या निकालानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होतील. एक जागा रिक्त आहेच, अन्य काहीजणांना बदलण्याचा विचारही सुरू असल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. फोंडा पोटनिवडणूक निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळात फेरबदल होतील. रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरलेली नाही. रवी यांच्याकडील खातीही कोणाला दिलेली नाहीत. फोंडा पोटनिवडणूक होऊ द्या, नंतरच निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
फोंडा पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपची उमेदवारी स्व. रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांना मिळाली आहे. मागील निवडणुकीत मगोचे उमेदवार राहिलेले डॉ. केतन भाटीकर आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. ‘आप’नेही उमेदवार उतरवला आहे. मागच्या वेळी डॉ. भाटीकर यांनी स्व. रवी नाईक यांना कडवी झुंझ दिली होती. फोंड्यात २०१२ मध्ये मगोचे स्व. लवू मामलेदार यांनी काँग्रेसच्या स्व. रवी नाईक यांचा पराभव केला होता. फोंड्यात मंत्री ढवळीकरांचे बरेच कार्यकर्ते आहेत. मगोचे पारंपरिक मतदारही आहेत. डॉ. भाटीकर यांचे मगो कार्यकर्ते व पारंपरिक मतदारांशी स्नेहाचे संबंध आहेत. रितेश नाईक यांच्या विजया‌त मंत्री ढवळीकर व मगो कार्यकर्त्यांचे योगदान निर्णायक ठरणार आहे. भाजपचा पराभव झाल्यास सुदिन ढवळीकरांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी जोर धरणार आहे.
यापूर्वी दोन वेळा सुदिनना दिला होता डच्चू
२०१७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना मगोचे सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. तसेच २०१९ मध्ये शिरोडा मतदारसंघातून मगोचे दीपक ढवळीकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्रिपदी डॉ. प्रमोद सावंत होते.