चोरीस गेलेल्या शस्त्राचे अस्तित्व सिद्ध करण्यात अपयश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : चोरीस गेलेल्या शस्त्राचे अस्तित्व सिद्ध करण्यात तपास अधिकाऱ्याला अपयश आले. तसेच संशयिताच्या ताब्यात देण्यात आलेले शस्त्र चोरी केल्याचा आरोप आणि पुरावे नष्ट केल्याचा पुरावा सादर करण्यात अपयश आले, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फेलिक्स दा लिमा यांची निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. सारिका फळदेसाई यांनी दिला.
अनिता राड्रिग्ज यांनी पणजी पोलिसांत ६ आॅगस्ट २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागाराची जबाबदारी निवृत्त उपनिरीक्षक फेलिक्स दा लिमा यांच्याकडे होती. २००३ मध्ये लिमा निवृत्त झाले. २००१ ते २००३ या काळात सिंगल बॅरल व डबल बॅरल प्रत्येकी एक बंदुक, पिस्तूल मॅगझिन, ४०० काडतुसे आणि एक पिस्तूल चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. पोलिसांनी लिमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ९ आॅगस्ट २००५ रोजी लिमा यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ७ जून २०१६ रोजी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. २० आॅगस्ट २०२१ रोजी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन आरोप निश्चित करून खटला सुरू केला. लिमा यांच्यातर्फे वकील ए. कारापूरकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फेलिक्स दा लिमा यांची निर्दोष सुटका केली.
संशयिताच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद
खटला शस्त्रागारातील वस्तूंच्या यादीशी संबंधित कार्यवाहीवर आधारित आहे, जी बेकायदेशीर आणि अनधिकृत आहे.
शस्त्रागारातील स्टॉक व मुव्हमेंट रजिस्टरसारखी महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यात आलेल्या दस्तावेजाच्या नोंदींच्या माध्यमातून शस्त्रे आणि दारुगोळ्याच्या अस्तित्वाचा कोणत्याही प्रकारे खुलासा होत नाही.
आपल्या अशिलाविरोधात कोणताही पुरावा नसल्यामुळे त्याची निर्दोष सुटका करावी.