मुरगाव : ‘प्रभू व्हायोलेटा’तील लोकांनी बिऱ्हाड अन्यत्र हलविले

अतिसाराच्या रुग्णांची संख्या १६० वर : बिल्डरकडून टँकरद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
55 mins ago
मुरगाव : ‘प्रभू व्हायोलेटा’तील लोकांनी बिऱ्हाड अन्यत्र हलविले

वास्को : दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा (Prabhu Violetta) या निवासी संकुलात रविवारी दोन नवीन रुग्ण आढळल्याने अतिसाराच्या रुग्णांची (Diarrhoea cases) संख्या १६० वर पोहोचली. दूषित पाण्यामुळे अनेक रहिवासी तात्पुरते अन्यत्र निघून गेले आहेत. आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अनेक कुटुंबे फ्लॅट सोडून भाड्याच्या घरात किंवा नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित झाली आहेत. एका रहिवाशाने सांगितले की, लोकांना आता येथे राहणे सुरक्षित वाटत नाही. अनेक दिवसांपासून त्रास सहन करणारी अनेक कुटुंबे आता तात्पुरती बाहेर गेली आहेत.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार, बिल्डरने आता सांडपाणीवाहू टँकरद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रांत नेण्यास सुरुवात केली आहे. मंडळाने संकुलातील दोन्ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत टँकरद्वारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या होत्या.
अधिकाऱ्यांच्या इतक्या दबावानंतर आणि कारवाईनंतर, बिल्डरने अखेर निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांमध्ये टँकरद्वारे सांडपाणी पाठवण्यास सुरुवात केली आहे. हे खूप आधीच व्हायला हवे होते, असे एका रहिवाशाने सांगितले. या उपाययोजना करूनही रहिवाशांनी या संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींकडून पाठिंबा न मिळाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. सरपंचांव्यतिरिक्त आमच्या समस्या समजून घेण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी येथे आला नाही. आमदार, मंत्री किंवा खासदार यांच्यासह कोणताही राजकारणी या ठिकाणी फिरकला नाही, असे या रहिवाशाने सांगितले.

पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा!
बिल्डरने आमची अद्याप भेट घेतलेली नाही. तसेच ही समस्या सोडवण्यासाठीच्या कोणत्याही ठोस योजनेवर चर्चाही केली नाही. अनेक रहिवासी आता मानसिकदृष्ट्या हताश झाले आहेत आणि काहींनी तर पुढे येणेच थांबवले आहे. पोलिसांकडे या प्रकरणी अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांडपाणी सोडले जात असल्याचे प्रकार स्वतः पाहिले आहेत. परंतु एफआयआर दाखल करण्यापलीकडे या प्रकरणात कोणतीही प्रगती झाल्याचे आम्हाला दिसून आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांनी ठामपणे कारवाई करावी, अशी आमची विनंती आहे, असे एका रहिवाशाने सांगितले.

हेही वाचा