जनसेवा हीच प्राथमिकता; विश्रांती न घेता मुख्यमंत्री कामावर रुजू

काल रात्री गोव्यात दाखल; आज सकाळी साखळीच्या रवींद्र भवनात नागरिकांशी साधला संवाद.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
35 mins ago
जनसेवा हीच प्राथमिकता; विश्रांती न घेता मुख्यमंत्री कामावर रुजू

पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या प्रकृतीबाबत पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम देत आज पुन्हा एकदा जनसेवेत धडाका रुजू झाले आहेत. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आवश्यक वैद्यकीय उपचार आणि चाचण्या पूर्ण करून मुख्यमंत्री काल रात्री उशिरा गोव्यात दाखल झाले. विश्रांती घेण्याऐवजी त्यांनी आज सकाळीच आपल्या साखळी मतदारसंघातील रवींद्र भवन येथे आयोजित 'जनता दरबार'त हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी थेट संवाद साधला. 



खाजगी कामानिमित्त पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना गुरुवारी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. समीर शर्मा आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पुरवेझ ग्रांट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. राष्ट्रीय स्तरावरील काही प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांवर अँजिओप्लास्टी झाल्याचे वृत्त दिले होते, परंतु रुग्णालय प्रशासन आणि खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या वृत्ताचा ठामपणे इन्कार केला. ही केवळ एक 'नियमित आरोग्य तपासणी' होती आणि सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली नसल्याचा व्हिडिओही रुग्णालयाने जारी करून स्पष्टीकरण दिले होते.



दरम्यान १९ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची सात वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या डॉ. सावंत यांनी गोव्यात परतताच कामाचा ताबा घेतला आहे. सोशल मीडियात त्यांच्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आजच्या जनता दरबारामुळे पूर्णविराम मिळाला आहे. माझी प्रकृती आता पूर्णपणे ठीक असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेला दिला. 

हेही वाचा