बी.एस्सी, बीबीए आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी आता एका क्लिकवर.

पणजी: गोव्यातील उच्च शिक्षण संचालनालयाच्या (डीएचई) प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमधील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची प्रवेश प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान यांसारख्या पारंपारिक शाखांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सोमवार, २३ मार्च २०२६ पासून अधिकृतपणे सुरू होणार असल्याची माहिती संचालनालयाने दिली आहे. पदवी स्तरावरील शिक्षणासाठी उत्सुक असलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून, प्रवेशासाठी Samarth e-Gov या पोर्टलचा वापर केला जाईल.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., बीसीए, बीबीए, बी.व्होक, पीजीडीसीए, बी.पी.एड. यांसारख्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसह संगीत, नाट्य, गृहविज्ञान, कृषी, एएनएम आणि जीएनएम या विशेष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी आपले अर्ज सादर करू शकतील. इच्छुक उमेदवारांनी सोमवार, २३ मार्च रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून उच्च शिक्षण संचालनालयाच्या https://www.dhe.goa.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि तांत्रिक माहिती समर्थ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज सादर केल्यानंतर त्यांची छाननी करणे, अर्जांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणे आणि त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांकडे सोपवण्यात आली आहे. प्रवेशाबाबतच्या अधिक माहितीसाठी किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी अर्जदारांनी आपल्या पसंतीच्या संबंधित महाविद्यालयाशी फोन किंवा ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत अर्ज सादर करून विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन वर्षांप्रमाणेच सर्व महाविद्यालयांसाठीची प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाइन स्वरूपात राबवली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर महाविद्यालयांकडून गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यंदाही याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी दिली आहे.

दरम्यान, बारावी विज्ञान शाखेतील बरेच विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि फार्मसी यांसारख्या व्यावसायिक शाखांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे प्रथम वर्ष बी.एस्सी.ची प्रवेश प्रक्रिया ही प्रामुख्याने व्यावसायिक महाविद्यालयांमधील प्रवेश फेऱ्यांच्या निकालावर अवलंबून असते.