
पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच उद्या सोमवारी भाजपचे उमेदवार रितेश नाईक आणि काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना गर्दी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने काही निर्बंध घातल्यामुळे उमेदवारांना अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करता येणार नाही.
फोंडा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाकडून १५ मार्च रोजी निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली, तरी त्यापूर्वीच इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली होती. भाजपचे उमेदवार रितेश नाईक, काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर आणि 'आप'चे गितेश नाईक यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी रितेश नाईक आणि विश्वनाथ दळवी ही दोन नावे पाठवण्यात आली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी भाजपने रितेश नाईक यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विश्वनाथ दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. आता विश्वनाथ दळवी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, मात्र उमेदवारी नाकारल्याने मला धक्का बसला आहे," अशी प्रतिक्रिया विश्वनाथ दळवी यांनी व्यक्त केली. "मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेईन," असेही त्यांनी सांगितले. उमेदवारीबाबत त्यांनी अद्याप ठोस वक्तव्य केलेले नसल्यामुळे त्यांच्या आजच्या निर्णयाविषयी उत्सुकता कायम आहे.
दुसरीकडे, आमचा प्रचार वेगात सुरू आहे. काँग्रेसचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते माझ्यासाठी जोमाने काम करत आहेत, विजय आमचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी व्यक्त केला आहे.