१४ वरिष्ठ अधिकारी नियमित : बढतीसाठी सेवाकाळ पूर्ण होत नसल्याने नाराजी


गोवन वार्ता
पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) ६५ पैकी फक्त १४ वरिष्ठ अधिकारी नियमित कार्यरत आहेत. प्रधान मुख्य अभियंत्याचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. इतर वरिष्ठ पदांवर हंगामी पद्धतीने बढती देऊन खात्याचे कामकाज सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडब्ल्यूडीमध्ये एक प्रधान मुख्य अभियंता, पाच मुख्य अभियंते, १३ अधीक्षक आणि ४६ कार्यकारी अभियंते, अशी ६५ पदे मंजूर आहेत. हंगामी पद्धतीने बढती दिलेला अधिकारी ‘मुख्य अभियंता’ पदाचे कामकाज पाहत आहे. या अधिकाऱ्यांना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी हंगामी पद्धतीने ‘मुख्य अभियंता’ पदावर बढती दिली आहे. यात संदीप चोडणेकर, विश्वंभर भेंडे आणि दत्तप्रसाद कामत यांचा समावेश आहे. यातील संदीप चोडणेकर यांच्याकडे प्रधान मुख्य अभियंता पदाचा ताबा दिला आहे. चोडणेकर नियमित अधीक्षक अभियंता आहेत. त्यांना हंगामी पद्धतीने ‘मुख्य अभियंता’पदी बढती देऊन खात्याचे कामकाज सुरू ठेवले आहे. ‘अधीक्षक अभियंता’ पदावर ८ अधिकाऱ्यांना हंगामी पद्धतीने बढती दिली आहे. यात संजय गावडे, प्रदीप गावडे, सुनील गावडे, नारायण तिवरेकर, स्वप्नील देसाई, लेस्टर डिसोझा, जुड कार्व्हालो आणि आर्मस्ट्राँग फर्नांडिस यांचा समावेश आहे. हे अधिकारी नियमित कार्यकारी अभियंता आहेत. याशिवाय संदीप गावडे, वॅनिसियो डिकॉस्टा आणि विन्सेंट डिसोझा हे अधिकारी नियमित कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. यातील वॅनिसियो आणि विन्सेंट १ एप्रिल २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत.
‘कार्यकारी अभियंता’ पदावर ४४ अधिकाऱ्यांना हंगामी पद्धतीने बढती देण्यात आली आहे. हे अधिकारी नियमित साहाय्यक अभियंता आहेत. वरील अधिकारी सिव्हिल गटातील अाहेत. वरील पदांची मंजूर संख्या ६५ झाली आहे. वरील पदाचे कामकाज हंगामी पद्धतीने सुरू असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचा बढतीसाठी लागणारा सेवा काळ पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांना बढतीपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी काही अधिकाऱ्यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याशिवाय खात्यात मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल गटाचे अभियंता आहेत. त्यातील ‘अधीक्षक अभियंता’ची दोन पदे आणि ‘कार्यकारी अभियंता’ची पाच पदे मंजूर आहेत.
बढतीसाठी आवश्यक सेवाकाळाची अट
कार्यकारी अभियंता पदावर बढतीसाठी पदवीप्राप्त साहाय्यक अभियंत्याला ८ वर्षांचा सेवा काळ पूर्ण करावा लागतो. डिप्लोमाप्राप्त साहाय्यक अभियंत्याला १२ वर्षांचा सेवा काळ पूर्ण करावा लागतो.
अधीक्षक अभियंता पदावर बढतीसाठी कार्यकारी अभियंत्याला ५ वर्षांचा सेवा काळ पूर्ण करावा लागतो.
मुख्य अभियंता पदावर बढतीसाठी अधीक्षक अभियंत्याला ५ वर्षांचा सेवा काळ पूर्ण करावा लागतो.
हंगामी पद्धतीने बढती मिळालेल्या अधिकाऱ्याचा हा काळ बढतीसाठी ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे आवश्यक सेवा काळ पूर्ण न झाल्यामुळे वरिष्ठ पदावर नियमित बढती मिळत नाही.