जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती : १६ एप्रिलपासून पहिला टप्पा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्राथमिक तसेच विद्यालयीन शिक्षकांंची नियुक्ती होणार आहे. १६ एप्रिल ते १५ मेपर्यंत होणाऱ्या घरांंच्या गणनेच्या कामामुळे शिक्षकांंना उन्हाळी सुट्टीतही काम करावे लागणार आहे. जनगणनेसाठी १२०० ते १५०० शिक्षकांची गरज भासणार आहे. शिक्षण सचिव आणि शिक्षण संंचालकांंशी बोलून नेमका आकडा आम्ही निश्चित करणार आहोत, अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंंकित यादव यांनी दिली. गरजेनुसार जनगणनेसाठी शिक्षकांची व्यवस्था केली जाईल, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
गोव्यासह देशभरात ‘जनगणना २०२७’ची प्रक्रिया सुरू होणार आहे. १ ते १५ एप्रिलपर्यंत सेल्फ इन्युमरेशन झाल्यानंतर १६ एप्रिलपासून घरांंची गणना सुरू होईल. १५ मेपर्यंत हा टप्पा पूर्ण होणे आवश्यक आहे. या टप्प्यासाठी गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांंसह अधिकाऱ्यांंची व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे जिल्हाधिकारी अंंकित यादव यांनी सांगितले.
राज्यात सुमारे ४ हजार प्राथमिक शिक्षक आहेत. या शिक्षकांंना एप्रिल महिन्यात सुट्टी असते. त्यामुळे घरांंना भेटी देऊन माहिती घेण्यासाठी प्राथमिक शिक्षकांंची नियुक्ती केली जाईल. काही तालुके लहान, तर काही मोठे आहेत. गरजेप्रमाणे त्या, त्या तालुक्यांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. मात्र शक्यतो शिक्षक ज्या भागात शिकवत आहेत, त्याच भागातील घरांना भेटी देऊन माहिती घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाईल. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल. घरांंना भेटी देऊन किती प्रश्न विचारायचे, त्याची लेखी स्वरूपात माहिती दिली जाईल. अर्ज भरून ते सादर करण्याविषयी मार्गदर्शन केले जाईल. एका शिक्षकाने दररोज किती घरांना भेटी द्याव्यात याविषयीचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. शिक्षण खात्यासोबत बैठका घेऊन ते ठरवले जाईल, असे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी स्पष्ट केले.
एनईपीमुळे शिक्षकांच्या सुट्या कमी झाल्या आहेत. त्यांना जादाचे वर्ग घ्यावे लागतात. आता जनगणनेच्या कामामुळे शिक्षकांना एप्रिल/मे महिन्याची सुट्टी मिळणार नाही.
घरगणनेसाठी ३३ प्रश्नांची माहिती घेणार
घरांंच्या गणनेच्या पहिल्या टप्प्यात ३३ प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत. घराचा क्रमांक, भिंत/बांधकामासाठी वापरलेले साहित्य, घराचा वापर, घराची स्थिती, घरातील कचरा, घरात राहणाऱ्या व्यक्ती, घराचा कर्तापुरुष, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालय, स्वयंपाकाची जागा, एलपीजी जोडणी वा स्वयंपाकासाठीच्या इंंधनाबाबत विचारले जाईल. घरात रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप, इंंटरनेट सेवा, स्मार्ट फोन आहे का, हे प्रश्न विचारले जातील. सायकल, स्कूटर, कार, जीप अशा वाहनांंचीही नोंद केली जाणार आहे.
शिक्षकांच्या नियोजनाबाबत शैलेश झिंगडे म्हणाले...
जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना पाठवावे, असे परिपत्रक शिक्षण खात्याने भागशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
तालुक्याला आवश्यक शिक्षकांची संख्या समजल्यानंतर भागशिक्षणाधिकाऱ्यांना कळवला जाईल.
सुमारे दीड हजारपर्यंत शिक्षक जनगणनेसाठी लागतील.
प्राथमिक शाळांंना एप्रिलमध्ये सुट्टी असल्यामुळे या कामाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही.
प्राथमिक शिक्षक आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध न झाल्यास विद्यालयीन शिक्षक नियुक्ती केले जातील.
जनगणनेतील शिक्षकांंना या काळात शिकवण्याची जबाबदारी राहणार नाही.
संंगीत, शारीरिक शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षकांंचीच नियुक्ती केली जाईल.
मे महिन्यात इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या वर्गांना सुट्टी असते. त्यामुळे विद्यालयीन वर्गांवरही परिणाम होणार नाही.