बांबोळी येथील गोमेकॉत सुरू होते उपचार

पणजी : कदंब बगल मार्गावर मारुती वॅगन आर कारने धडक दिल्यामुळे आणि ट्रॅक्टर अंगावरून गेल्यामुळे दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, बांबोळी येथील गोमेकाॅत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अज्ञात मारुती व्हॅगन आर कार आणि ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आडपई - फोंडा येथील आश्विनी नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान कदंब बगल मार्गावर फर्न कदंब हॉटेलसमोर, अज्ञात मारुती व्हॅगन आर कारने प्रथम दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरील दोघे रस्त्यावर पडले. याच दरम्यान मागाहून येणारा ट्रॅक्टर दुचाकी चालकाच्या अंगावरून गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने तक्रारदाराने तिच्या पतीला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अज्ञात मारुती व्हॅगन आर कार आणि ट्रॅक्टर चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(बी) आणि १०६(२) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १३४ (ए)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक गौरीश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत पोखरे पुढील तपास करीत आहेत.