वाळपई नवोदय विद्यालयामागील नदीत २७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

शोधकार्य सुरू : मडगाव घोगळ येथील युवक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd March, 11:56 pm
वाळपई नवोदय विद्यालयामागील नदीत २७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

वाळपई : येथील नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या नदीमध्ये २७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. संबंधित तरुण आपल्या मित्रांसमवेत नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला होता. मात्र, दुर्दैवाने तो पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेहाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर रात्री सुमारे साडेआठ वाजता शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मडगाव घोगळ येथील महाबळी पटेल (वय २७) हा शनिवारी साजरा झालेल्या कार्यक्रमानिमित्त वाळपई येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता. त्यावेळी तो आपल्या मित्रांसोबत होता. रविवारी सायंकाळी नवोदय विद्यालयामागील नदीमध्ये तो मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेला असता अचानकपणे तो पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी तत्काळ नातेवाईकांना दिली. तसेच अग्निशामक दलाला कळविण्यात आले. माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत महाबळी पटेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री साडेआठ वाजेपर्यंत प्रयत्न करूनही मृतदेह सापडू शकला नाही.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी तरुण बुडाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आहे. त्यामुळे तो चिखलात रुतून अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, यामुळे शोधकार्य करण्यात अडचणी येत आहेत.

सोमवारी सकाळी पुन्हा एकदा मृतदेहाचा शोध घेण्याचे कार्य हाती घेण्यात येणार असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही नागरिकांनी पोलीस स्थानकात जाऊन या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मृत तरुणाच्या मित्रांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान संतोष गावस, अरविंद देसाई, अशोक नाईक, कालिदास गावकर, ज्ञानेश्वर सावंत, साईनाथ सावंत, प्रतेश गावकर, दत्ताराम देसाई तसेच उमेश गावकर आणि आपदा मित्र स्वप्निल दळवी यांनी सहभाग घेतला.

यापूर्वीही बुडण्याच्या घटना...

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले असून काही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. नदीतील काही भागात खोल खड्डा असल्यामुळे असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या ठिकाणी आंघोळीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा