बाल लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ डाऊनलोड करणे भोवले

सीबीआयच्या कारवाईनंतर तिसवाडीतील युवकाविरोधात आरोप निश्चितीचा आदेश


30 mins ago
बाल लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ डाऊनलोड करणे भोवले

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : मोबाईल फोन जप्त केल्यानंतर, संशयिताच्या फोनवर लैंगिक मजकूर आढळून आला आहे, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील ‘पाेक्सो’ न्यायालयाने तिसवाडी तालुक्यातील युवकाविरोधात लैंगिक अत्याचार तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ऑनलाईन बाल लैंगिक शोषण विभागाने आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या (इंटरपोल) माहितीवरून दिल्ली येथील सीबीआयच्या विशेष विभागाने २०२२ मध्ये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली होती. संशयितांनी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केला होता. या प्रकरणी सीबीआयच्या तपासात संबंधित व्हिडिओ गोव्यासह दिल्ली, तसेच इतर राज्यांत डाऊनलोड केल्याची माहिती मिळाली. याच संदर्भात सीबीआयला संबंधित यंत्रणेने तिसवाडीतील एका युवकाच्या मोबाईल क्रमांकासह इतरांचे मोबाईल क्रमांक दिले होते. त्यानुसार, सीबीआयच्या दिल्ली येथील विशेष विभागाने तिसवाडीतील युवकाच्या घराची झडती घेतली.
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू झाली असता, संशयिताकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचाराशी संबंधित व्हिडिओ आढळून आला आहे, असे निरीक्षण नोंदवून पोक्सो न्यायालयाने सदर युवकाविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे.
मोबाईलमध्ये आढळला आक्षेपार्ह व्हिडिओ
सीबीआयने संशयित युवकाचा मोबाईल जप्त केला. मोबाईलमध्ये बाल लैंगिक शोषण प्रकरणाचा व्हिडिओ डाऊनलोड केला असल्याचे दिसून आले. सीबीआयने सदर युवकाला अटक न करता ४ मे २०२३ रोजी पणजी येथील ‘पाेक्सो’ न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ बी यांचा समावेश करण्यात आला आहे.