फोंडा पोटनिवडणुकीसाठी तिघांचे अर्ज दाखल : आरजीच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला बळ

रितेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. भाजपकडून रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर, आम आदमी पक्षाकडून गीतेश नाईक यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक लढवण्याच्या ‘आप’च्या निर्णयामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील थेट लढत टळली. आरजीने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे बळ वाढले आहे. ‘आप’मुळे भाजपविरोधी मतांची विभागणी होईल आणि त्याचा फायदा भाजपला होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे अखेर ही पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २४ मार्च रोजी होणार असून गुरुवार, २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तीनच अर्ज दाखल झाल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता राहिलेली नाही. त्यामुळे ही लढत तिरंगी होणार हे जवळपास निश्चित आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पक्ष पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. गोव्याचे हित डोळ्यांसमोर ठेवून भाजपचा पराभव करण्यासाठी पक्षाचा काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले आहे. उमेदवार ठरवताना चर्चा न केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. आरजीचा पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसचे बळ वाढले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सध्याचे काँग्रेसचे उमेदवार मगोचे उमेदवार होते. त्यावेळी डॉ. भाटीकर यांना भाजपच्या रवी नाईक यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता रिंगणात तीनच उमेदवार असल्याने मतदान चुरशीने होण्याची शक्यता आहे. आरजीची साथ मिळाल्यामुळे डॉ. भाटीकर यांचा विश्वास दुणावला आहे. मात्र ‘आप’चे उमेदवार गीतेश नाईक रिंगणात असल्यामुळे ते किती मते मिळवतात आणि त्याचा फायदा भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांना होईल का, हे पहावे लागणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोटनिवडणुकीत मतदार भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांना विजयी करून स्व. रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहणार आहेत, असे म्हटले आहे. काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी डॉ. केतन भाटीकर यांच्या विजयाने विधानसभेत पक्षाच्या आमदारांची संख्या ४ होईल, असे म्हटले आहे. 
भाजप, मगोचे कार्यकर्ते एकत्र प्रचार करणार : वीजमंत्री
सोमवारी सकाळी भाजपचे अधिकृत उमेदवार रितेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, नगरसेवक विश्वनाथ दळवी आणी रितेश नाईक यांच्यात मतभेद नाहीत. प्रचारावेळी दोघेही एकत्र फिरणार आहेत. वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, रितेश नाईक यांचा विजय निश्चित आहे. भाजप आणि मगोचे कार्यकर्ते एकत्रितपणे प्रचार करणार आहेत.
काँग्रेसचा विजय निश्चित : अमित पाटकर
काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, राजेश वेरेकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अमित पाटकर म्हणाले, काँग्रेसचा विजय निश्चित असल्याने भाजप सरकार घाबरले आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी सरकारी यंत्रणा भाजपसाठी काम करण्याची शक्यता आहे. 
रितेश, केतन भाजपेचच उमेदवार : व्हेंझी
आपचे उमेदवार गीतेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार व्हेंझी व्हिएगस आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार व्हेंझी म्हणाले, पोटनिवडणुकीत आमच्या विरोधात भाजपचेच दोन उमेदवार रिंगणात आहेत. भाजप सरकार अस्तित्वात असूनही ते उपजिल्हा इस्पितळात आवश्यक साधने सुविधा उपलब्ध करू शकले नाहीत. त्यामुळे मतदारांनी गीतेश नाईक यांना विजयी करण्याची गरज आहे.