पर्यटकांची कार समुद्रकिनारी धुवायला नेणे अंगलट

हणजूण पोलिसांकडून गेस्ट हाऊसच्या कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
40 mins ago
पर्यटकांची कार समुद्रकिनारी धुवायला नेणे अंगलट

जेसीबीच्या सहाय्याने कार पाण्याबाहेर काढण्यात आली.


म्हापसा : धुवायला दिलेली ग्राहक पर्यटकाची कारगाडी वॉशिंग सेंटरमध्ये न नेता वागातोर समुद्रकिनारी धुण्यासाठी नेली असता ही गाडी समुद्राच्या पाण्यात वाहून गेली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी अर्जुन सिंग रावत (रा. मूळ उत्तराखंड) या वागातोर मधील एका गेस्ट हाऊसच्या कामगाराविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना रविवारी २२ रोजी सकाळी घडली होती. अहमदनगर गुजरात येथील पर्यटक युवक हे गोव्यात पर्यटनासाठी आले होते व ते वागातोर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये उतरले होते. शनिवारी फिरून आल्यावर त्यांनी आपली जीजे ०१ डब्ल्यूवाय ००९० क्रमांकाची टोयोटा फोर्चुनर ही आलिशान कारगाडी संशयित आरोपीकडे वॉशिंग सेंटरमध्ये धुवून आणायला दिली.
संशयित आरोपीने सकाळी उठल्यावर ही गाडी वॉशिंग सेंटरमध्ये न नेता वागातोर समुद्रकिनारी धुवायला नेली. गाडी धुत असताना भरतीमुळे ती पाण्यात वाहून गेली. हा प्रकार सकाळी ९ च्या सुमारास घडला. समुद्रकिनारी असलेले स्थानिक आणि पर्यटकांनी ही वाहून जाणारी कारगाडी पकडली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी पाण्यातून ओढून बाहेर आढण्यात आली.
निष्काळजीपणे वाहन चालवून समुद्रकिनारी नेऊन मानवी जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम सीएमव्हीआर कायदा कलम आर ५१ व मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला नोटीस बजावली असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पेडणेकर हे करत आहेत.      

हेही वाचा