दोघांना अटक : पर्यटन खात्याकडून शॅकचा परवाना निलंबित

म्हापसा : कळंगुट समुद्रकिनारील प्लॅनेट गोवा बीच शॅकमध्ये बंगळुरूमधील ७ जणांच्या पर्यटक गटावर क्षुल्लक कारणावरून खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी दिनेश कुमार व धुपेंद्र यादव या दोघा शॅकच्या कर्मचार्यांना अटक केली आहे. तसेच या शॅकमध्ये पर्यटकांवर दुसर्यांदा हल्ला घडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या अहवालानुसार पर्यटन खात्याने शॅकचा परवाना निलंबित केला आहे.
सय्यद झाकीर (२७, बंगळुरू) याने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी ११:३० च्या सुमारास हे पर्यटक समुद्रात आंघोळ करून शॅकच्या खुर्च्यांवर बसले होते. यावेळी शॅकच्या एका कामगाराने त्यांना शिवीगाळ करत उठण्यास सांगितले. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. शॅकच्या कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन पर्यटकांना बेदम मारहाण केली, ज्यात पर्यटक रक्तबंबाळ झाले. जखमींवर गोमेकॉत उपचार करण्यात आले आहेत.
या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी शॅक मालकाला ३० मार्च रोजी पर्यटन खात्यासमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. दरम्यान, शॅक मालकावर २५ लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी माहिती पर्यटन संचालक केदार नाईक यांनी दिली. कळंगुट पोलिसांनी मंगळवारी रात्री फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शॅककडून कायद्याचे वारंवार उल्लंघन
* याच शॅकमध्ये ३ जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील सहा पर्यटकांवरही असाच हल्ला झाला होता.
* पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही शॅक व्यवस्थापनाने शिस्त राखली नाही.
* पोलिसांच्या अहवालानुसार, पर्यटन खात्याने वारंवार होणाऱ्या कायद्याच्या उल्लंघनामुळे शॅकचा परवाना रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.