इंधन टंचाईच्या अफवेने नागरिकांची धावपळ; व्यावसायिक सिलिंडरअभावी हॉटेल्समध्ये पेटल्या चुली, पेट्रोलाचा तुटवडा नाही; मुख्यमंत्र्यांचा दिलासा

पणजी : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि संभाव्य इंधन टंचाईच्या अफवेमुळे गेल्या दोन दिवसांपासून गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेट्रोल-डिझेल संपणार या भीतीने नागरिक ‘पॅनिक मोड’वर गेले असून, राज्यातील इंधन पुरवठा केंद्रांवर मोठी झुंबड उडाली आहे. दुसरीकडे, व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील परिस्थितीबाबत केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याने नागरिक ‘पॅनिक मोड’वर गेले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेषतः कळंगुट, बागा आणि मिरामार यांसारख्या किनारी भागांत १०० ते २०० मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. राज्यात इंधन स्वस्त असल्याने शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या पर्यटकांनीही आपल्या वाहनांमध्ये आणि कॅनमध्ये इंधनाचा साठा करण्यास सुरुवात केली आहे, यामुळे स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण गोव्यात पसरलेल्या इंधन टंचाईच्या अफवांवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गुरुवारी पडदा टाकला. राज्यात पेट्रोल आणि एलपीजी सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून, नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडी, व्यावसायिक सिलिंडरचा कोटा आणि महत्त्वाच्या सरकारी योजनांबाबतही घोषणा केल्या.
खाद्यपदार्थांच्या दरातही मोठी वाढ
अनेक रेस्टॉरंट मालकांनी आता पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत चुलीवर जेवण करण्यास सुरुवात केली आहे. बिर्याणी, डाळ, भात आणि रस्सा यांसारखे पदार्थ आता लाकडाच्या चुलीवर शिजवले जात आहेत. मात्र, गॅसची बचत करण्यासाठी स्टार्टर्स आणि वारंवार गॅस लागणारे पदार्थ अनेक ठिकाणच्या मेन्यू कार्डवरून गायब झाले आहेत. केवळ थाळी आणि बिर्याणीसारखे पदार्थ उपलब्ध करून दिले जात असून, इडली, समोसा आणि भाजी यांसारख्या खाद्यपदार्थांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एकूणच, इंधन आणि गॅसच्या या दुहेरी संकटामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाला मोठी झळ पोहोचत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, शॅकमध्ये ग्राहक कमी असल्यामुळे व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही. मागील दोन दिवसांत पर्यटकांची संख्या वाढली असून, रेस्टॉरंटमध्ये गर्दी आहे. मात्र, खर्च करणारे पर्यटक कमी असल्याने शॅक व्यावसायिकांना विशेष फायदा होत नसल्याचे शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष मॅन्युएल कार्दोज यांनी सांगितले. पुढील काही दिवस परिस्थिती सुधारेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात पुढील ८ दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे. व्यावसायिक सिलिंडरचा कोटा २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येत आहे, ज्यामुळे हॉटेल मालकांना दिलासा मिळेल. घरगुती गॅस बुकिंगनंतर २५ दिवसांनी उपलब्ध होईल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा;
चुलीवर स्वयंपाक
* गॅस सिलिंडरची टंचाई हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. गॅस वाचवण्यासाठी जास्त वेळ लागणारे पदार्थ मेन्यूतून गायब झाले आहेत. बिर्याणी आणि रस्सा यांसारखे पदार्थ आता चुलीवर शिजवले जात आहेत.
* काही ठिकाणी एका सिलिंडरसाठी ३ ते ७ हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती मॅन्युएल कार्दोज यांनी दिली.
* गॅस अभावी कळंगुट परिसरातील १ ते २ हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
कदंब बस सेवेला डिझेलचा फटका
डिझेलच्या दरातील तफावतीमुळे कदंब महामंडळासमोर पेच निर्माण झाला आहे. कदंब ही सरकारी संस्था असल्याने तिला थेट पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांकडून थेट मिळणारे डिझेल रु. ११० प्रति लिटर पडत आहे, तर बाहेर पंपावर ते रु. ८८.२० आहे. स्वस्त डिझेलसाठी बस स्थानकाबाहेरील पंपावर जात असल्याने कदंब बस वेळेत पोहोचण्यास विलंब होत आहे, परिणामी पणजी बसस्थानकावर प्रवाशांचे हाल होत आहेत.
गोव्यात सद्यघडीला पेट्रोलची टंचाई नाही. लोक पॅनिक होऊन इंधन भरण्यासाठी रांगा लावत असल्याने काही पेट्रोल पंपांवर साठा संपला आहे. गोव्यात ८ दिवस पुरेल इतका इंधनसाठा असून आजच ७ दिवस पुरेल इतका साठा डेपोमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. - नरहर ठाकूर, अध्यक्ष, गोवा पेट्रोल डीलर्स असोसिएशन.