फोंडा पोटनिवडणूक : गुन्हेगारी कृत्यांमुळे ‘आप’चे उमेदवार गोत्यात

काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत; आज सुनावणी


23 mins ago
फोंडा पोटनिवडणूक : गुन्हेगारी कृत्यांमुळे ‘आप’चे उमेदवार गोत्यात

पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर. सोबत आमदार अॅड. कार्लुस फेरेरा व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : फोंडा पोटनिवडणुकीतील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार गीतेश नाईक यांनी प्रतिज्ञापत्रात स्वतःविरुद्ध नोंद असलेल्या काही गुन्ह्यांची, तसेच कर्ज प्रकरणातील माहिती नमूद केलेली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचे वकील अॅड. कार्लुस फेरेरा यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे यासंदर्भात हरकत अर्ज सादर केला असून बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
फोंडा विधानसभेची पोटनिवडणूक ९ एप्रिल रोजी होणार आहे. सोमवारी ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मंगळवारी अर्जांची छाननी झाली. त्यावेळी गीतेश नाईक यांनी दाखल केलेल्या अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना मालमत्ता, उत्पन्न, तसेच गुन्हेगारी प्रकरणांची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देणे बंधनकारक असते. गीतेश नाईक यांनी राजस्थान व बंगळुरू येथे नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
बंगळुरू (केंगरी) येथे १५ जुलै २०२५ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (३) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंद असल्याचे सांगण्यात आले. तसेच राजस्थानमध्ये आयपीसीच्या ४०६ व ४२० कलमांखाली गुन्हा नोंद असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला. याशिवाय ३८ लाख १८ हजार रुपये कर्जाची परतफेड न केल्याने एका वित्तीय कंपनीने ३१ मे २०२४ रोजी कुडचडे येथील घर व भूखंड जप्तीची नोटीस बजावल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे. आवश्यक माहिती लपवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप करून उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
धनादेश बाऊन्सची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद
गीतेश नाईक यांनी दिलेले ५ लाख रुपयांचे धनादेश दोन वेळा बाऊन्स झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद असून या संदर्भातील खटला दिवाणी न्यायालयात सुरू असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे.

भंडारी समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न : गीतेश नाईक
२०१२ मध्ये निवडणूक लढविताना राजकीय हेतूने खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा गीतेश नाईक यांनी केला. गुन्हे सिद्ध झालेले नसताना आरोप करणे हे भंडारी समाजाविरुद्धचे कारस्थान आहे. मला मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे, असेही गीतेश नाईक यावेळी म्हणाले.