अमली पदार्थ तस्करी प्रकरण : ८ एप्रिल रोजी सुनावणी

पणजी : कोकेन बाळगल्याप्रकरणी इस्रायली नागरिक डेव्हिड ड्रिहम ऊर्फ डुडू याला सत्र न्यायालयाने मंजूर केलेल्या सशर्त जामिनाला राज्य सरकारने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने या प्रकरणी डुडूला नोटीस बजावली असून, पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी निश्चित केली आहे.
या प्रकरणी एनसीबीने २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला. त्यानुसार, हणजूण परिसरात डुडू ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय असल्याची माहिती गुप्तहेरांनी एनसीबीला दिली होती. एनसीबीचे उपसंचालक नितीन गवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन निरीक्षक फ्रान्सिको झेवियर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ३ जून २०२५ रोजी अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) हणजूण परिसरात छापा टाकून डुडूला ताब्यात घेतले होते. त्याच्या झडतीमध्ये ११ ग्रॅम कोकेन सापडले होते. एनसीबीने १ डिसेंबर २०२५ रोजी मेरशी येथील विशेष न्यायालयात डुडूविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने सादर केलेल्या पुराव्यांची दखल घेत डुडूविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून आरोप निश्चित केले आहेत.
दरम्यान, म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ४ जून २०२५ रोजी डुडूला सशर्त जामीन मंजूर केला. या जामीन आदेशाला आता सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, ८ एप्रिलच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीही अटक, नंतर निर्दोष मुक्तता
यापूर्वी २१ फेब्रुवारी २०१० रोजी हणजूण येथे २ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह डुडूला अटक करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणाचे धागेदोरे पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात न्यायालयाने पुराव्याअभावी त्याची मुक्तता केली होती, उलट तपास पथकावरच कारवाईचे निर्देश दिले होते. तसेच २०१९ मधील एका चाकू हल्ला प्रकरणातही त्याची निर्दोष सुटका झाली होती.