लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर १ एप्रिलला निवाडा

म्हापसा सत्र न्यायालयाचा निकाल राखीव; सरकारी पक्षाचा जामिनाला विरोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26 mins ago
लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर १ एप्रिलला निवाडा

म्हापसा : हडफडे बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणी संशयित आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्या जामीन अर्जावरील निवाडा म्हापसा अति‌रिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे.
मंगळवारी २४ रोजी झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील जेनिफर सांतामारीया यांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यांनी अर्जदार संशयितांच्या जामिनाला जोरदार आक्षेप घेतला. सरकार पक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावरील सुनावणी १ एप्रिलपर्यंत तहकूब केली. त्या दिवशी न्यायालयाकडून निकाल देण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संशयितांच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती केली होती.
दरम्यान, हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचे मालक लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी फेटाळला होता. त्यानंतर संशयितांनी जामीन मिळण्यासाठी पुन्हा नवीन जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला होता. या अर्जावरील ११ मार्च रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात प्रथम सुनावणी झाली होती. दरम्यान, या सुनावणीवेळी अर्जदार संशयित आरोपी लुथरा बंधू न्यायालयात हजर होते.
हडफडे येथे ६ डिसेंबर रोजी रात्री बर्च क्लबमध्ये घडलेल्या या भीषण आग दुर्घटनेत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. तर सहाजण जखमी झाले होते. मृतांमध्ये ५ पर्यटक आणि २० क्लब कर्मचारी होते.
१४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र सादर
हडफडे बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणात हणजूण पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. तर एकूण १४ संशयित आरोपींविरुद्ध भादंसंच्या १०५, १२५, १२५(अ), १२५(ब), २८७, ३३८, ३३६(३), ३४०(२), ६१(२), २३८, २४१, ३(७) व ३(५) कलमांन्वये न्यायालयात आरोपपत्र सादर केलेले आहे.

हेही वाचा