कुडचडेतील लैंगिक अत्याचार प्रकरण : पीडितांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास मंगळवारी गुन्हा शाखेकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला. संशयित सोहम नाईक (२०, मड्डेगाळ-काकोडा) याच्याविरोधात कुडचडे पोलिसांनी ‘पोक्सो’ व गोवा बाल कायदा अंतर्गत आणखी दोन गुन्हे दाखल केले. हे प्रकरण समोर आल्यानंतर दोघा अल्पवयीन विद्यार्थिनींनीही त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.
कुडचडे येथील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कुडचडे पोलिसांनी रविवार, २२ मार्च रोजी गुन्हा दाखल करून संशयित सोहम नाईक याला अटक केली होती. त्यानंतर दोघा अल्पवयीन मुलींनी दोन वेगवेगळ्या तक्रारी पोलिसांत दाखल केल्या. त्यात १७ वर्षीय पीडित मुलीवर ती १४ वर्षाची असताना संशयिताने १ जानेवारी ते ३० जून २०२३ दरम्यान तिच्याशी मैत्री केली. याच दरम्यान संशयिताने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच संशयिताने सदर घटनेचे आपल्या मोबाईल फोनवर चित्रीकरण केले. संशयिताने सदर चित्रीकरण त्याच्या मित्रांना पाठविल्याचे म्हटले आहे.
दुसरी तक्रार १६ वर्षीय मुलीने दिली आहे. त्यानुसार, संशयित सोहम नाईक याने २०२४ ते २०२५ या दरम्यान पीडित मुलीशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला. तिला त्याचा अश्लील फोटो पाठवला आणि तिचे फोटो पाठवण्यास सांगितले. तिने तसे न केल्यास तिच्या मोठ्या बहिणीसोबत संशयिताचे असलेले संबंध सार्वजनिकरीत्या उघड करण्याची धमकी दिली. तक्रारदार मुलीवर ओळखीच्या मुलीची माहिती देण्यास दबाव टाकला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याची दखल घेऊन कुडचडेचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी संशयित सोहम याच्याविरोधात गोवा बाल कायदा आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पाेक्सो) अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवा पोलिसांनी वरील प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पोलीस महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांनी आदेश जारी करून वरील प्रकरण गुन्हा शाखेकडे सुपूर्द केले आहे. गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परेश नाईक पुढील तपास करत आहेत. त्यांना उपनिरीक्षक संध्या गुप्ता मदत करत आहेत.
साेहमने अल्पवयीन मुलींना केले लक्ष्य
संशयित सोहम सुशांत नाईक कुडचडे परिसरातील माध्यमिक विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांत शिकणाऱ्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याच्या मित्राच्या किंवा त्याच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत तो मैत्री करून त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
तपासाबाबत उपहानिरीक्षकांचे पोलिसांना मार्गदर्शन
पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी कुडचडे पोलीस स्थानकात भेट देऊन प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले. यावेळी दक्षिण गोवाचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई, अधीक्षक आशिष शिरोडकर व इतर अधिकारी उपस्थित होते.