म्हापसा पोलिसांवर खुनी हल्लाप्रकरणी जेनिरियो मिरांडाला १५ महिन्यांची शिक्षा

खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपातून मात्र मुक्तता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 mins ago
म्हापसा पोलिसांवर खुनी हल्लाप्रकरणी जेनिरियो मिरांडाला १५ महिन्यांची शिक्षा

म्हापसा : सर्वेवाडा, गिरी येथे घडलेल्या म्हापसा पोलिसांवरील सुरी हल्ला प्रकरणी आरोपी जेनिरियो जॉन मिरांडा याला १ वर्ष ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र (जलद) न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी ठोठावली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात हस्तक्षेप आणि जाणीवपूर्वक दुखापत करणे, तसेच कायदेशीर कारवाईला विरोध करण्याच्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३३२ व २२४ अन्वये आरोपीला ही शिक्षा न्यायालयाने दिली आहे. तर सरकारी पक्ष हा पोलिसांवरील प्राणघातक हल्ल्याच्या बाबतीत सबळ पुरावे न्यायालयात सादर करू शकला नाही. त्यामुळे खूनी हल्ल्याच्या भा.दं.सं.च्या ३०७ कलमातून आरोपाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
अटक झाल्यानंतर आरोपी हा ११ महिने २८ दिवस कोठडीत होता. त्यामुळे ही कालावधी वरील शिक्षेतून वगळण्यात आली आहे. तसेच संशयिताकडून जप्त केलेला ५० ग्रॅम गांजाच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा आदेशही न्यायालयाने या निवाड्यात दिला आहे.
दरम्यान, ही घटना १ मार्च २०१७ रोजी सायंकाळी घडली होती. आपल्यासह मुलाला पतीने मारहाण केल्याची तक्रार मारीयाना मिरांडा यांनी म्हापसा पोलीस स्थानकात करून ती घरी परतली तेव्हा आरोपीने घरातून पळ काढला. नंतर संशयित आरोपीने एका गायीवर सुरी हल्ला करत तो लोकांच्या मागे लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपीने तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक एलिडिओ फर्नांडिस (दिवंगत), उपनिरीक्षक दीपेश शेटकर, हवालदार इर्शाद वाटांगी, देवेश गोलतेकर, राजेश कांदोळकर यांच्यावर दगड आणि सुरीने हल्ला केला होता. यात वरील पाचही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
जखमी अवस्थेत पोलिसांनी आरोपीला पकडून भा.दं.सं.च्या ३३२, १८६, २२४ व ३०७ कलमांखाली अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.