नैराश्यातून कर्मचाऱ्यांची सतावणूक

पणजी : कनिष्ठ नागरी सेवा अधिकारीपदावर पदोन्नती (promotion) मिळूनही काही मामलेदारांना (Mamlatdar) अद्याप नवीन पदभार (posting) मिळालेला नाही. यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली असून, या नैराश्यातून काही मामलेदारांनी कर्मचाऱ्यांची सतावणूक (harassment) सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सुटी मंजूर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त काम देणे असे प्रकार मामलेदार कार्यालयांमध्ये सुरू असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गोवा सरकारने ऑक्टोबरमध्ये मामलेदार आणि अधीक्षक मिळून ३९ जणांना 'जेएसओ' पदावर बढती दिली होती. या आदेशाला पाच महिने उलटले तरी अनेक मामलेदारांना अद्याप नवीन पदे मिळालेली नाहीत. परिणामी, त्यांना आजही मामलेदाराचीच कामे करावी लागत आहेत. याचा राग काही अधिकारी कर्मचाऱ्यांवर काढत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
बढतीचे आदेश निघाल्यानंतर जिल्हा पंचायत निवडणूक पार पडली. सध्या फोंडा पोटनिवडणुकीमुळे दक्षिण गोव्यात आचारसंहिता लागू आहे. त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. आता जनगणनेचे काम सुरू होणार आहे, तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग फेररचनेचे कामही सुरू आहे. या सर्व महत्त्वाच्या कामांसाठी अनुभवी मामलेदारांची गरज असल्याने बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांना नवीन पदे देणे सरकारला शक्य झालेले नाही.