श्री स्वामी समर्थ परिवार मठ, शिवोली

अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचा महिमा सर्वदूर आहे. अनेकांना त्यांच्या चमत्काराची प्रचिती आली आहे. त्यामुळे गावागावांत श्री स्वामी समर्थांच्या मठाची स्थापना होत आहे. अशाच प्रकारे शिवोली येथील पुलाच्या बाजूलाच एक आकर्षक व टुमदार मंदिर उभे आहे.

Story: देवभूमी गोवा |
23rd March, 06:09 pm
श्री स्वामी समर्थ परिवार मठ, शिवोली

गुडे गावातील व्यावसायिक तथा स्वामी समर्थ परिवार मठाचे संस्थापक व अध्यक्ष नीलेश वेर्णेकर आपल्या मित्र मंडळीसह देवदर्शनासाठी गेले होते. शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन माघारी येताना अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांच्या अंतर्मनात झाली. त्यानुसार ते अक्कलकोटला गेले. तेथील परिसर, मठातील पावित्र्य, शीतलता पाहिल्यावर समाधानाची अनुभूती त्यांना झाली. तेथील महाप्रसादाने मिळालेली तृप्तता ते आजही विसरले नाहीत. मठाचा निरोप घेताना त्यांनी मठासाठी काही देणगी दिली. त्या बदल्यात त्यांना मठातील साधकांकडून स्वामी समर्थांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून देण्यात आली. ते घरी आल्यानंतर त्यांच्या मनात स्वामी समर्थांची प्रतिमा घर करून राहिली. साईभक्त असलेल्या वेर्णेकर यांना स्वामी समर्थांचा ध्यास लागला. मठातून मिळालेल्या स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे काय करायचे या विचाराने ते अस्वस्थ झाले.

आपल्या मनात चाललेली ही विचलता त्यांनी आपल्या मित्रांना कथन केली. बाबुसो वायंगणकर व अन्य काही मित्र आणि त्यांच्या कुटुंबियाकडून प्रोत्साहन मिळाल्यानंतर स्वामींच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्याचा ध्यास त्यांच्या मनात घर करून राहिला. स्वामी समर्थांचा दृष्टांतही त्यांना स्वप्नात झाला आणि अखेर ९ नोव्हेबर २००८ रोजी स्वामींच्या त्या छोट्या प्रतिमेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या जागेवर नंतर पत्र्याचे छप्परही करण्यात आले. हळूहळू या जागेचे एका छोट्या घुमटीमध्ये रूपांतर झाले व अवघ्या काही वर्षात याठिकाणी आता स्वामींचे भव्य दिव्य असे मठ (मंदिर) उभे आहे. सुरुवातीला नीलेश वेर्णेकर हे एकटेच आरती, अभंग व गजर म्हणत होते. नंतर हळूहळू वेर्णेकर यांना अन्य स्वामी भक्तांची साथ मिळाली. मठात गायिल्या जाणाऱ्या आरती व त्यांची चाल सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागली. अल्पाअवधीतच आरती सर्वांच्या तोंडी लोकप्रिय झाल्या.

प्रकटदिनी बार्देश, पेडणे तालुक्यांत पालखी परिक्रमा

९ नोव्हेंबर या दिवशी शिवोलीत स्वामी प्रकट झाल्याचे औचित्य साधून ‘९ नोव्हेंबर’ हा दिवस ‘स्वामी प्रकटदिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त संपूर्ण पेडणे व बार्देश तालुक्यांत स्वामींच्या पालखी परिक्रमाचे आयोजन केले जाते. स्वामींची पालखी अंदाजे ३०० धार्मिक स्थळांना भेट देते. यावेळी त्या-त्या जागी पालखी रात्रीचा मुक्काम करत दुसऱ्या दिवशी पुन्हा परिक्रमा करते. ८ नोव्हेंबर रोजी पालखीचे मठात आगमन होते. दुसऱ्या दिवशी, ९ नोव्हेंबर रोजी स्वामींचा प्रकटदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

मठाद्वारे राबविले जाणारे उपक्रम

या मठाला मराठी सिने कलाकार स्वप्नील जोशी यांच्यासह अनेक राजकीय नेते, तसेच बॉलिवूड सिनेतारकांनीसुद्धा भेट दिली आहे. आता या मठाद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. मठात रक्तदान शिबिर, झाडांचे वाटप यासारखे उपक्रम होतात. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवोली पंचक्रोशीतून दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. दर गुरुवारी पहाटे ६ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, ९ ते १२ पर्यंत महाअभिषेक, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होतो. सायंकाळी ७ वा. स्वामी समर्थांची मठाभोवती पालखी प्रदक्षिणा होऊन रात्री ८ वाजता आरती व तीर्थप्रसाद नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. यावेळी हजारो संख्येने स्वामी भक्त उपस्थित असतात. मठात म्हटल्या जाणाऱ्या आरती, अभंग व गजरांमुळे भाविकांचे मन प्रसन्न होते. दर गुरुवारी सुमारे दहा हजार भाविक मठाला भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतात.

स्वामी समर्थ परिवार मठातील उत्सव

मठाचा वर्धापनदिन : २६ जानेवारी (तारखेनुसार)

महाशिवरात्री उत्सव : माघ कृ. १३

स्वामी समर्थांची जयंती : चैत्र शु. २

स्वामी समर्थांची पुण्यतिथी : चैत्र कृ. १३

गुरुपौर्णिमा : आषाढ शु. १५

शिवोलीतील स्वामी समर्थ प्रकटदिन : ९ नोव्हेंबर (तारखेनुसार)

श्री दत्तजयंती : मार्गशीर्ष शु. १४

गोवा मुक्तिदिन : श्री साई सत्चरित्र व श्री साई पालखी सोहळा      

- प्रीतेश बाबली गारुडी देसाई