रितेश, भाटीकर, गीतेश मैदानात

फोंडा पोटनिवडणूक : भाजप, काँग्रेस, आप उमेदवारांचे अर्ज दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
48 mins ago
रितेश, भाटीकर, गीतेश मैदानात

पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपचे उमेदवार रितेश नाईक, काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर आणि आम आदमी पार्टीचे गीतेश नाईक यांनी आपापल्या समर्थकांसह आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. एका बाजूला भाजपने नाराज नेत्यांची मनधरणी करत एकीचे बळ दाखवले आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने ‘आरजी’च्या पाठिंब्यावर विजयाचा विश्वास व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भाजपला नाराजी दूर करण्यात यश

माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले भाजपचे मूळ नेते विश्वनाथ (अपूर्व) दळवी यांची मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. चर्चेअंती दळवी यांनी रितेश नाईक यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचा मार्ग सुकर झाला आहे. दळवी हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेसची ‘आरजी’सोबत हातमिळवणी

काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी युरी आलेमाव यांनी भाजपवर ‘लोकशाहीची हत्या’ केल्याचा आरोप केला. गोव्याला वाचवण्यासाठी मला विष प्यावे लागले तरी मी तयार आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. तसेच, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने (आरजी) दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपचा पराभव करणे सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रवी नाईक यांच्या मूळ काँग्रेस विचारधारेचा वारसा आपणच पुढे नेणार असल्याचेही ते म्हणाले.

‘आप’चीही निवडणुकीत उडी

आम आदमी पार्टीतर्फे गीतेश नाईक यांनीही कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यामुळे फोंड्याची ही पोटनिवडणूक आता तिरंगी आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी भाजपला घेरले असले, तरी प्रत्यक्ष मतदानात फोंडेकर कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. फोंडा पोटनिवडणुकीसाठी आता तिन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाल्याने पुढील काही दिवसांत प्रचाराची रणधुमाळी अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा