उपअधीक्षकांची माहिती. स्थानिक, राजकारणी आणि समाजसेवकांनी घेतली होती कुडचडे पोलिसांची भेट.

पणजी : कुडचडे: दक्षिण गोव्यातील कुडचडे-काकोडा परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील संशयित सोहम सुशांत नाईक याच्याविरुद्ध पोलिसांनी आता 'पोक्सो' (POCSO) आणि 'गोवा बाल कायदा' (Goa Children's Act) अंतर्गत कठोर कलमे लागू केली आहेत. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी दिलेल्या तीव्र इशाऱ्यानंतर आणि पोलीस स्थानकावर घातलेल्या घेरावानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
मुळात या सेक्स स्कँडलचा उलगडा एका सामाजिक कार्यक्रमात सोहम सुशांत नाईकने पीडितांचे अश्लील व्हिडिओ सहकाऱ्यांना दाखवून बढाई मारल्याने झाला. या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओंच्या चर्चा दक्षिण गोव्यात पसरताच स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, गेल्या काही दिवसांपासून कुडचडे आणि काकोडा परिसरात या कथित सेक्स रॅकेटबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला ठोस माहितीच्या अभावामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर कुडचडेतील नगरसेवकांनी पोलिसांची भेट घेऊन ४८ तासांत चौकशी पूर्ण करून कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला . या इशाऱ्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रविवारी मड्डेगाळ-काकोडा येथील संशयित युवक सोहम नाईक याला ताब्यात घेतले. या अटकेमुळे प्रकरणातील प्राथमिक संशयाला पुष्टी मिळाली असली, तरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पीडितांच्या संरक्षणासाठी कडक कायदेशीर कलमे लावण्याची मागणी जोर धरू लागली.

दरम्यान आज सोमवारी या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक स्वरूप प्राप्त झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, दुर्गादास कामत, विकास भगत आणि 'बायलांचो एकवोट' संस्थेच्या आवडा व्हीएगस यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांना घेराव घातला. या वेळी झालेल्या चर्चेत नेत्यांनी असा दावा केला की, पीडितांचे वय आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहता केवळ सामान्य कलमे पुरेशी नाहीत. आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि गोवा बाल कायदा लागू करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी आमदार विजय सरदेसाई यांनी थेट पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत जाणून घेतली.
वरिष्ठ स्तरावरून झालेल्या या हस्तक्षेपानंतर आणि उपस्थित जनसमुदायाचा रोष पाहता, पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी या गुन्ह्यात पोक्सो आणि गोवा बाल कायद्याची कलमे समाविष्ट करण्याचे मान्य केले आहे. या निर्णयामुळे आता तपास अधिक कडक होणार असून पीडितांना कायदेशीर संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजसेवक आवडा व्हिएगस या कारवाईचे स्वागत केले असून, अशा गुन्ह्यांमुळे समाजातील नैतिक अध:पतन रोखण्यासाठी कठोर शिक्षेची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या कारवाईबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपअधीक्षक (DySP) आशिष शिरोडकर यांनी स्पष्ट केले की, संशयित सोहम नाईकविरुद्ध प्राप्त झालेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे 'पोक्सो' आणि 'गोवा चिल्ड्रन्स ॲक्ट'नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांनी पीडितांना न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले असून, त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता सखोल तपास करत आहेत.