चाबुआ आणि बिकानेर हवाई तळाची माहिती लीक केल्याचा आरोप; राजस्थान गुप्तचर विभागाने केला उलगडा.

जयपूर: भारतीय हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला (ISI) पुरवल्याच्या आरोपावरून एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राजस्थान गुप्तचर विभागाने केलेल्या सखोल तपासातून हे प्रकरण उघडकीस आले असून, यामध्ये एक मोठे गुप्तहेरांचे जाळे सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
या प्रकरणाचा उलगडा जानेवारी २०२६ मध्ये जैसलमेर येथील झबरा राम याला ताब्यात घेतल्यानंतर झाला. राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) प्रफुल्ल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, झबरा राम याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी थेट संपर्क असल्याचे तपासात समोर आले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांना सुमित कुमारपर्यंत पोहोचता आले.
अटक करण्यात आलेला ३६ वर्षीय सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी आहे. तो आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील चाबुआ येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर 'मल्टी-टास्किंग स्टाफ' (MTS) म्हणून कार्यरत होता.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, सुमित कुमार २०२३ पासून पाकिस्तानी गुप्तचर हँडलर्सच्या संपर्कात होता. आपल्या पदाचा वापर करून त्याने हवाई दलाशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवली. या बदल्यात त्याला आर्थिक मोबदला मिळत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीदरम्यान त्याने चाबुआ आणि बिकानेर येथील 'नाल' हवाई दल तळासह लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र प्रणालींच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती दिल्याची कबुली दिली आहे. तसेच, काही पाकिस्तानी हँडलर्सना सोशल मीडिया खाती तयार करण्यासाठी स्वतःच्या नावावर घेतलेले सिम कार्ड आणि मोबाईल क्रमांक पुरवल्याचेही समोर आले आहे.
राजस्थान गुप्तचर विभाग आणि हवाई दलाच्या गुप्तचर यंत्रणेने संयुक्त कारवाई करून सुमित कुमारला चाबुआ येथून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी जयपूरला आणले. या प्रकरणी जयपूर येथील विशेष पोलीस ठाण्यात 'अधिकृत गोपनीयता कायदा १९२३' (Official Secrets Act) आणि 'भारतीय न्याय संहिता २०२३' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दुव्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.