
पणजी : कदंब वाहतूक महामंडळाने (KTC) पणजीतील (Panjim) इलेक्ट्रिक बस (Electric Buses) चालवण्यासाठी ईव्ही ट्रान्स या कंपनी सोबत करार केला आहे. ही कंपनी बस चालकांना केवळ १७ ते १८ हजार रुपये वेतन देत आहे. सध्याची महागाई पाहता हे वेतन अत्यंत कमी आहे. या बस चालकांचे वेतन वाढवून महिन्याला किमान ३० हजार रुपये करावे; अशी मागणी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे अध्यक्ष ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केली.
सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कदंब चालक आणि संलग्न कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. फोन्सेका म्हणाले की, ई बस चालकांना हक्काच्या रजा दिल्या पाहिजेत. त्यांना वेळेवर ओव्हर टाईम मिळणे आवश्यक आहे. सरकारने कंपनीच्या खर्चाची रक्कम वाढवली आहे. याआधी ही कंपनी ७६ रुपये प्रति किलोमीटर या दराने काम करत होती.
आता ते वाढवून ८६ रु प्रति किमी केले आहे. असे असताना कामगारांचा पगार का वाढत नाही; याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. वास्तविक इलेक्ट्रिक बस ही कदंबच्या खाजगी करणाची सुरूवात आहे. कदंबतर्फे अन्य कामे देखील आउटसोर्स केली जात आहेत. एकूणच हे महामंडळ बंद करून खाजगी कंपनीच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ते म्हणाले, कदंबच्या २५० हून अधिक बस स्क्रॅप झाल्या आहेत. अशावेळी कमी पल्ल्यांच्या ईव्ही बस घेण्याऐवजी लांब पल्ल्याच्या ३०० डिझेल बस घ्याव्यात. ७ वा वेतन आयोग लागू केला तरी कर्मचाऱ्यांची थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही.
याआधी झालेल्या बैठकीत सरकाने ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र; एक वर्षे झाले तरी यावर कारवाई झालेली नाही. याबाबत आम्ही सर्व कामगारांमध्ये पुन्हा एकदा जागृती करणार आहोत. आमची चळवळ सुरूच राहील. कामगारांसोबत चर्चा करून धरणे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.