गोवा-महाराष्ट्र सीमेवर 'ओंकार'चा वावर वाढला; प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे

ऐन तोंडावर आलेले काजूचे पीक अन् सिंधुदुर्ग-गोवा सीमाभागात झालेले 'ओंकार' हत्तीचे दर्शन; बागायतदार आणि शेतकऱ्यांत धास्ती.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
59 mins ago
गोवा-महाराष्ट्र सीमेवर 'ओंकार'चा वावर वाढला; प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे

सावंतवाडी/दोडामार्ग: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या निसर्गरम्य सीमावर्ती भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या 'ओंकार' हत्तीने पुन्हा एकदा सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे परिसरात आपला मुक्काम ठोकला आहे. विशेष म्हणजे, काल रविवारी दुपारी हा हत्ती गोव्यातील पेडणे तालुक्यातील हणखणे परिसरात दिसून आला होता आणि तिथूनच त्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केला आहे. सध्या कोकणातील काजू, आंब्याच्या पिकाने जीव धरला आहे. यंदा चांगले पीक येईल अशी आशा बाळगून असलेला बायतदार व सामान्य शेतकरी या परिसरात हत्तींच्या वाढत्या वावरामुळे पूर्णपणे धास्तावले असून, त्यांच्यासमोर आर्थिक संकटासोबतच जिवाचा धोकाही निर्माण झाला आहे.


'ओंकार' हत्तीचा संचार गोवा-महाराष्ट्र सीमाभागात. वन खात्याच्या २५ कर्मचाऱ्यांचे पथक त्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहे. तो आपणहून मूळ ठिकाणी गेला नाही तर पूर्वीप्रमाणे त्याला हाकलले जाईल : 
जीस वर्की, उप वन संरक्षक 

तीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर ओंकार पुन्हा एकदा पेडणेच्या हणखणे परिसरात परतल्याने गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे वन विभाग आता हायअलर्टवर आले आहेत. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास, 'ओंकार' हत्तीने गोवा राज्यातील मोपा विमानतळ परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. त्यानंतर तो दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांच्या सीमावर्ती भागात सातत्याने आपली जागा बदलत आहे. हणखणे हे गाव महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेले असल्याने, हत्तीला या दोन्ही राज्यांमध्ये ये-जा करणे सोपे झाले आहे. सध्या सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यांच्या परिसरात एकूण सहा हत्तींचा वावर असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. यातील पाच हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यात प्रामुख्याने तिलारी खोऱ्यात सक्रिय असून, 'ओंकार' मात्र एकटाच नेतर्डे आणि हणखणे या परिसरात फिरत आहे.





शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या काजूचा हंगाम सध्या ऐन भरात आहे. बागांमध्ये काजू गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आता हत्तीच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हत्ती केवळ बागांचे नुकसान करत नाही, तर काजूची झाडे उपटून टाकणे आणि उभ्या पिकांची नासाडी करणे यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. वर्षभराची मेहनत या हत्तीच्या एका फेरीत मातीमोल होत असल्याने सीमाभागातील बळीराजा हतबल झाला आहे. वन कर्मचारी हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असले, तरी दाट झाडी आणि डोंगराळ भागामुळे हत्तीला रोखणे मोठे आव्हान ठरत आहे.


सावंतवाडी: ओंकार हत्तीचा धुमाकूळ, शेतीचे मोठे नुकसान; ग्रामस्थ आंदोलनाच्या  तयारीत - Marathi News | Omkar Elephant Roaming Farms In Sawantwadi Causing  Crop Damage Locals Warns Protest ...


दरम्यान, या हत्तीला जेरबंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, ही संपूर्ण मोहीम सध्या न्यायालयीन पेचात अडकली आहे. एका सामाजिक संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हत्तीला पकडण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यातच, प्रसिद्ध 'वनतारा' टीमने या हत्तीला पकडून नेण्यास काही स्थानिक स्तरावरून विरोध होत असल्याचेही समोर आले आहे. या तांत्रिक आणि न्यायालयीन कारणांमुळे वन विभागाचे हात बांधले गेले आहेत. जोपर्यंत या न्यायालयीन प्रक्रियेतून मार्ग निघत नाही, तोपर्यंत हत्तीचा हा उपद्रव सुरूच राहणार असल्याचे चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

हेही वाचा