गुजरात ते दिल्ली; आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत मोदींची यशस्वी घोडदौड सुरू.

नवी दिल्ली: भारताच्या राजकीय इतिहासात काल नव्या विक्रमाची नोंद झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ 'सरकार प्रमुख' म्हणून पदावर राहण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. रविवार २२ मार्च रोजी त्यांनी तब्बल ८,९३१ दिवस या पदाची धुरा सांभाळून सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८,९३० दिवसांचा प्रदीर्घ विक्रम मोडीत काढला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान अशा दोन्ही भूमिकांमधील त्यांचा एकत्रित कार्यकाळ आता भारतातील कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक ठरला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या प्रवासाची सुरुवात ७ ऑक्टोबर २००१ रोजी झाली. त्यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या काळी गुजरात भूकंप, चक्रीवादळ आणि भीषण दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत होता. अशा अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी राज्याची धुरा हाती घेतली. राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात त्यांनी केवळ गुजरातला सावरलेच नाही, तर गुजरातची 'सुशासनाचे केंद्र' म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली. कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या बदलांमुळे गुजरात मॉडेलची चर्चा देशभर झाली.

२०१४ मध्ये देशाच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडवत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या नेतृत्वाखाली पक्षाला निर्भेळ यश मिळवून देत त्यांनी लोकशाहीतील आपली पकड सिद्ध केली आहे. मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्याचा फायदा त्यांना राष्ट्रीय स्तरावर धोरण आखणीत झाला.

आपल्या सार्वजनिक जीवनातील मूल्यांबाबत बोलताना मोदींनी नेहमीच त्यांच्या आईंनी दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला आहे. गरिबांसाठी काम करा आणि कधीही लाच घेऊ नका, हे त्यांच्या आईचे शब्द आजही त्यांच्या कार्याची दिशा ठरवत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकार प्रमुख म्हणून २५ वर्षांचा टप्पा पूर्ण करताना त्यांनी देशातील जनतेचे आभार मानले होते. सामान्यांचे जीवनमान उंचावणे आणि भारताला जागतिक महासत्ता बनवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी वारंवार अधोरेखित केले आहे. ८,९३१ दिवसांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा विक्रम नसून, तो भारताच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे.