होर्मुझ सामुद्रधुनीचे संकट तीव्र; इराण आकारणार जहाजांवर १८ कोटी टोल

अमेरिकेची लष्करी कारवाईची धमकी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
51 mins ago
होर्मुझ सामुद्रधुनीचे संकट तीव्र; इराण आकारणार जहाजांवर १८ कोटी टोल

तेहरान : मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा एकदा तणावाच्या केंद्रस्थानी आली आहे. इराणने (Iran) या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर तब्बल २० लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे १८ कोटी रुपये) इतका टोल आकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयामुळे जागतिक तेल व नैसर्गिक वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजी वाहतूक या अरुंद समुद्री मार्गातून होते, त्यामुळे या घडामोडींना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

इराणचे खासदार अलाईद्दीन बोरोजेर्दी यांनी या निर्णयाला “नवीन सार्वभौम व्यवस्था” असे संबोधले आहे. “युद्धाला किंमत असते आणि त्यामुळेच या मार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांकडून शुल्क आकारणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या धमकीने पर‌िस्थिती आणखी चिघळणार

दरम्यान, अमेरिकेचे (USA) राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत हॉर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी त्यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

धमक्यांमुळे एकता अधिक मजबूत : इराण 

यावर प्रत्युत्तर देताना इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी ठाम भूमिका मांडली. “इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाऱ्यांसाठीच हा मार्ग बंद आहे. धमक्या आमची एकता अधिक मजबूत करतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सामुद्रधुनी पूर्णपणे बंद नसून “शत्रू राष्ट्रांव्यतिरिक्त सर्वांसाठी खुली” आहे. मात्र, इराणच्या लष्करी दलाकडून विशेषतः अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांवर निर्बंध आणले जात असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर हॉर्मुज सामुद्रधुनीतील तणाव वाढत असून, जागतिक तेल बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा